Wednesday, April 24, 2024
Homeनगरकोपरगावात वंचितांसाठी म्हाडाची घरे

कोपरगावात वंचितांसाठी म्हाडाची घरे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरातील जे नागरिक हक्काच्या घरापासून वंचित आहेत अशा वंचित नागरिकांना त्यांच्या हक्काची घरे मिळवून देण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच कोपरगाव नगरपरिषदेच्या व म्हाडाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली.

- Advertisement -

या बैठकीत उपस्थित अधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, सर्वांसाठी घरे ही केंद्र शासनाची योजना आहे. शहरातील ज्या नागरिकांना हक्काची घरे नाहीत अशा नागरिकांना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी नगरपालिकेच्या मालकीच्या बेट भागातील मोकळ्या भूखंडावर या नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत गरजू लाभार्थ्यांना माफक दरात घरे उपलब्ध करून द्यावीत अशा सूचना कोपरगाव नगरपालिका प्रशासनाला यापूर्वीच दिल्या आहेत. त्याबाबतीत म्हाडाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाकडे पाठवावा. त्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करून या नागरिकांना घरकुल मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोपरगाव शहरामध्ये मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे व वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील कामे लवकरात लवकर सुरू करा. नगरपालिका प्रशासनाला राज्यशासनाकडे ज्या अडचणी येतील त्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. शहरविकासाचे सर्व प्रस्ताव तातडीने तयार करून शासनाकडे सादर करा. घरकुल अनुदान, बचत गटाचे अनुदान, फेरीवाल्यांचे अनुदान याबाबत काळजी घेऊन हे अनुदान लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल याची काळजी घ्या. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत कोपरगाव शहरासाठी 5 आरोग्य केंद्र मिळणार असून त्यासाठी देखील प्रस्ताव तयार करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी यावेळी कोपरगाव नगरपालिका प्रशासनाला दिल्या.

यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, उपमुख्याधिकारी श्रीमती शिंदे, म्हाडा नाशिक विभागाच्या सौ. पवार, नगर अभियंता शंकर गावित, नगररचना सहाय्यक नितेश मिरीकर, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानचे शहर अभियान व्यवस्थापक रामनाथ जाधव, सी.एल.टी.सी. स्थापत्य अभियंता हर्षवर्धन सुराळकर, कोपरगाव नगरपरिषद वैद्यकीय अधिकारी डॉ. गायत्री कांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक मंदार पहाडे, संदीप पगारे, मेहमूद सय्यद, रमेश गवळी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या