विज बिल वाटप करण्यात दिरंगाई

jalgaon-digital
2 Min Read

भुसावळ – प्रतिनिधी – Bhusawal :

वीजग्राहकांना विजेच्या वापराची बिले मिळत नसताना देखील बिल भरले नाही या कारणास्तव विजेचे मीटर काढून नेण्याच्या वीज वितरण अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मनमानी कारभाराविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

येथील अधिकार्‍यांना विचारणा केली असता नवीन कंत्राटदारांला नुकतेच काम दिले आहे म्हणून उशीर झाल्याचे सांगतात परंतु वास्तविक पाहता कोरोना नंतर मागील तीन महिन्यापासून देयके वाटप केली नाहीय तसेच रिडींग न घेताच सरासरी देयके तयार केली जात असल्याने ग्राहकांना याची माहितीच मिळत नाही म्हणून याबाबत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे शिवसेनेचे शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे यांनी तक्रार केली आहे. आहे.

भुसावळ विभागातील वीज ग्राहक वीज वितरण कंपनीविरोधात संतप्त झाले असून, गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून साधारण ५० हजार ग्राहकांना वीज बिल मिळालेले नसून सरासरी देयकांचा पाऊस सुरूच आहे.

मात्र, वीज बिले न भरल्यास कारवाईचा बडगा उभारला जात आहे. अनेक महिन्यांपासून वीज बिले मिळत नसल्याने ग्राहक वीज कर्मचार्‍यांना विचारणा करीत आहेत. तर, वीज बिले तुम्ही काढा व तुम्ही भरा नाही तर मीटर काढले जातील असे वीज वितरण अधिकारी व कर्मचार्‍यांकडून सांगण्यात येत आहे.

संबंधितांच्या या मनमानीविरोधात ग्राहक संतप्त झाले असून, यामध्ये शिवसेनेकडे तक्रारी आल्याचे बबलू बर्‍हाटे यांनी सांगितले.

अश्यामुळे ग्राहक व वीज कर्मचारी व अधिकारी यांच्यामध्ये बाचाबाची होत असून, मोठा उद्रेक होऊन भांडण होऊ शकते. अनेकवेळा वीज वितरण कर्मचारी व अधिकारी यांना सांगूनही याबाबतीत नियोजन होत नाही.

तर जळगाव परिमंडळातील अधिकारीसुद्धा जाणीवपूर्वक लक्ष देत नसल्यामुळे ऊर्जा मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून मार्ग काढण्याची मागणी होत आहे. रिडींग न घेणार्‍या व वीज बिल वाटप करण्यात दिरंगाई करणार्‍या ठेकेदारवर कारवाई करावी अन्यथा ठेका काढून टाका व तेथे दुसरा ठेकेदार नेमावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुकाप्रमुख समाधान महाजन, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *