Thursday, May 9, 2024
Homeधुळेरामी शिवारात सापडले धातूचे जैन मंदिर

रामी शिवारात सापडले धातूचे जैन मंदिर

दोंडाईचा । श.प्र. Dondaicha

शिंदखेडा तालुक्यातील रामी येथे राहणारे रामा वेडू माळी यांच्या मालकीच्या शेतात मशागत करतांना प्राचीन काळातील धातूचे चारमुखी, 11 इंचचे लहान जैन मंदिर त्यांचे भाचे डिगंबर गंगाराम माळी यांना आढळून आले. याबाबत दोंडाईचा पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली.

- Advertisement -

मंदिर पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी गर्दी केली होती. दोंडाईचा मंडळ अधिकार्‍यांनी पंचनामा केला असून मंदिर दोंडाईचा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. मंदिराचे वजन चार किलो 250 ग्रॅम एवढे आहे. मंदिरात प्रमुख चार भगवंतांच्या मूर्ती असून 48 जैन भगवंतांच्या लहान मूर्ती आहेत.

दोंडाईचा येथील जैन बांधवांनी मंदिराची पाहणी केली. त्यांनी सांगितले की, 2000 वर्षापूर्वीचा पंचधातू मंदिर असून मंदिर चारमुखी 11 इंचाचे आहे. त्यावर प्राचीन काळातील कोरीव काम करण्यात आले आहे. तसेच कोरीव काम करुन भगवान महावीर यांची मूर्ती साकारण्यात आली आहे. मंदिर सापडल्याची माहिती अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ दखल घेवून पुरातत्व विभागालाही माहिती दिली. त्यानंतर रितसर पंचनामा करण्यात आला. त्यावेळी दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, प्रवीण महाजन हे घटनास्थळी उपस्थित होते. मंदिराचा पंचनामा करून मंदिर पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आले आहे.

अभ्यासकांना आव्हान

रामी येथे शेतीची मशागत करतांना प्राचीन धातूचे जैन मंदिर आढळून आले आहे. सदर मंदिर हे अभ्यासकांसाठी आव्हान आहे. शेतात मंदिर आले कसे? तेथे अजून खोदकाम केले तर प्राचीन वस्तू सापडतील काय? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. शेतजमीनीजवळ 15 फूटी रुंदीचा नाला देखील आढळला आहे. यामुळे शेतजमीनीत आढळून आलेले धातूचे मंदिर हे अभ्यासकांपुढे एक आव्हान आहे. पुरातत्व विभागानेही याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

मंदिर 11 इंच व चौमुखी

सद्य:स्थितीत सदर शेतजमीन रिकामी आहे. शेतजमीन जिरायत असून सपाट आहे. डिगंबर गंगाराम माळी यांनी दि. 21 मे रोजी शेतजमीनीत ट्रॅक्टरने टिलर मारले. त्यानंतर बैलजोडीने वखरणी केली. त्यावेळी त्यांना धातूचे चारमुखी 11 इंचचे छोटेसे जैन मंदिर आढळून आले. मंदिरात प्रमुख चार जैन भगवंतांच्या मूर्ती आहेत व 48 जैन भगवंतांच्या लहान मूर्ती आहेत. मंदिर हे धातूचे असून मंदिर कोरीव असून मंदिरावर कळस आहे. मंदिरातील प्रमुख चार मूर्तींच्या पायथ्याशी लिखाण आहे. मंदिराचे वजन चार किलो 250 ग्रॅम एवढे आहे. शेतजमीनीच्या पश्चिमेस सुमारे अर्धा किमी अंतरावर सुमारे 15 फूट रुंदीचा नाला आहे. या व्यक्तीरिक्त शेतजमीनीच्या जवळपास कोणतीही नदी अथवा नाला नसल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या