Saturday, April 27, 2024
Homeनाशिकमेरी कोविड केअर सेंटर कार्यान्वित; दिवसभरात २५० रुग्णांची तपासणी

मेरी कोविड केअर सेंटर कार्यान्वित; दिवसभरात २५० रुग्णांची तपासणी

पंचवटी | वार्ताहर

नाशिक शहरातील कोरोनाबधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन पंचवटीतील मेरी कोविड केअर सेंटर आजपासून कार्यान्वित झाले. पहिल्या दिवशी साधारण २३० व्यक्तीची तपासणी करण्यात आली. दरम्यान कोरोना बाधित रुग्णांना दाखल करून घेण्याची व्यवस्था करण्यात आलेली असली तरी कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या लक्षात घेता एक दोन दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे….

- Advertisement -

दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत असून, उपचारासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मेरी येथील पंजाबराव देशमुख वसतिगृहातील कोरोना केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी आमदार ऍड. राहुल ढिकले, गटनेते जगदीश पाटील आणि प्रभाग क्र. ३ च्या नगरसेविका प्रियंका माने यांनी मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. मनपाचे कोरोना केअर सेंटर नसल्याने नागरिकांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत होता.

यात नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत होती. त्यामुळे पंचवटीत गेल्या वर्षीप्रमाणे आताही पंजाबराव देशमुख वसतिगृह येथे कोरोना केअर सेंटर सुरू करणे गरजेचे असल्याची बाब लोकप्रतिनिधींनी मनपा आयुक्त जाधव यांच्या लक्षात आणून दिली.

आयुक्त जाधव यांनीही या मागणीची तातडीने दखल घेत विभागीय अधिकारी विवेक धांडे, कोरोना नोडल अधिकारी डॉ. विजय देवकर यांच्यासमवेत येथील जागेची पाहणी केली आणि आठवडाभराच्या आतच मेरी कोविड केअर सेंटर सुरू करण्याची कार्यवाही केली.

दरम्यान, नगरसेविका प्रियंका माने तसेच धनंजय माने यांनी मंगळवारी या सेंटरची पाहणी केली. यावेळी याठिकाणी मंडप उभारणी आणि अन्य साहित्य आणण्याचे काम सुरू होते. यानंतर आज (दि.३१) पासून कोविड सेंटर कार्यान्वित करण्यात आले.

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मनपा आयुक्तांच्या आदेशाने हे सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सेंटरमध्ये आरटीपीसीआर आणि अँटिजेन या दोन चाचण्या होणार आहेत. सध्या कर्मचारी संख्या अपुरी असल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची केवळ ओपीडी होणार आहे. दोन दिवसानंतर डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे नियोजन पूर्ण झाल्यावर पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले जाणार आहे.

डॉ. विजय देवकर, कोरोना नोडल ऑफिसर, पंचवटी

- Advertisment -

ताज्या बातम्या