Thursday, April 25, 2024
HomeनाशिकVideo : टागोरानंतरचे दुसरे महाकवी म्हणजे कुसुमाग्रजच

Video : टागोरानंतरचे दुसरे महाकवी म्हणजे कुसुमाग्रजच

नाशिक | हेमंत टकले

तात्यासाहेब माणुसकीने जगणारे अवलिया व्यक्तीमत्व होते. कोणत्याही दु:खी माणसाला सुखी करावे हाच दृष्टिकोन ठेऊन ते आयुष्यभर जगले. सर्वांशी कसे प्रेमाचे नाते ते जोडू शकत होते? हा प्रश्न आम्हाला नेहमी पडायचा. त्यांचे कोणाशी वैर नव्हते, ते अजातशत्रू होते. त्यांच्या स्वभावातील हेच वैशिष्ट त्यांच्या साहित्यातून जाणवले. त्यांना सामाजिक जाणीव प्रचंड होती. वैश्विक पातळीवर विचारा करणारा हा माणूस होता. निसर्गाशी नाते सांगणारा, माणसांशी नाते सांगणारा हा माणूस होता. माणसा-माणसातील वैर नष्ट कसे होईल, याचा सतत विचार ते करत होते. त्यांना असा समाज हवा होतो, जेथे कोणाचे कोणाशी वैर नव्हते. त्यांचा आम्हाला लाभलेला स्पर्श, सहवास हा आमच्यासाठी अमूल्य ठेवाच आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्यानंतर जर दुसरा महाकवी कोणी असेल ते कुसुमाग्रजच, असे आम्हास वाटते…

- Advertisement -

आम्ही पेठे हायस्कूलमध्ये शिकत होतो. त्यावेळी अ‌‌भ्यासक्रमात कुसुमाग्रजांच्या कविता होत्या. पेठे हायस्कूल म्हणजे लोकहितवादी मंडळाचे महत्वाचे स्थान होते. या शाळेत लोकहितवादी मंडळाच्या नाटकांच्या तालीम होत होत्या. त्यांच्या कवितांमुळे तात्यासाहेबांबाबत आम्हाला आकर्षण निर्माणच झाले होतेच.

त्यांनी लिहिलेल्या नाटकांच्या तालीम आमच्या शाळेत होत होत्या. शाळा सुटल्यावर त्या तालीम बघण्याचा उपक्रम आम्ही नेहमी करत होतो. तात्यासाहेब तेथील कट्ट्यावर बसून तालीम बघत होते, ही आमची व्यक्ती म्हणून झालेली पहिली ओळख म्हणता येईल. त्यापुर्वी पुस्तकातून त्यांची अक्षर ओळख झालीच होती.

मोठ्या व्यक्तींमुळे समुद्ध होत गेलो

शाळेचा प्रवास संपून मी महाविद्यालयात आलो होतो. तात्यासाहेबांच्या कवितांवर कार्यक्रम करत होतो. त्यांचे साहित्य जिरवत होतो. तोपर्यंत तात्यासाहेब राज्यातील तमाम मराठी भाषिकांपर्यंत पोहचलेच होते. त्यांच्या घरी कायम थोर-मोठ्या व्यक्तींची उठबस होत होती. तात्यासाहेबांचे घर सर्वांसाठी नेहमीच खुलेच होते. आम्हाला तात्यासाहेब आपलेच वाटत होते. यामुळे नाशिकमध्ये कोणीही मोठे व्यक्तिमत्व आले की, आम्ही एका शिस्तबद्ध स्वयंसेवकाप्रमाणे त्यांना तात्यासाहेबांचा घरी घेऊन जात होतो. त्यांच्या गप्पा लक्ष देऊन ऐकत होतो. माझ्या आठवणीत मंगेश पाडगावकर, वसंत बापट, विं.दा.करंदीकर इतर लेखक, नाटककारासोबत त्यांचा झालेला संवाद मी ऐकला आहे. यामुळे आपुसकच आमची सुमुद्धी वाढत गेली.

नारायण सुर्वेंच्या मुलीचे कन्यादान केले

तात्यासाहेबांकडे येणारी लोक पाहिली तेव्हा आम्हाला कळाला की हा माणूस खूप वेगळा आहे. लेखक, साहित्यिकच नव्हे तर विविध क्षेत्रातील लोक त्यांच्यांकडे येत होती. प्रत्येक नाशिककरांना वाटायचे की त्यांना भेटले पाहिजे. मग घरगुती भांडणे घेऊनही लोक त्यांच्याकडे येत होती. त्यांच्याकडे जे-जे येत होते, त्या सर्वांचे ते ऐकून घेत होते. वेळ नाही म्हणून कधी कोणास परत पाठवले नाही. ते सर्व गावाचे कुटुंबप्रमुखच झाले होते. नारायण सुर्वे यांच्या मुलीचे लग्न होते. त्याचे कन्यादान तात्यासाहेबांनी केले होते.

फेरफटका मारुन करत होते लिखान

नाशिक शहरात त्या काळात रस्त्यांवर पथदिवे नव्हते. टार्च घेतल्याशिवाय फिरता येत नव्हते. तात्यासाहेबांना रात्री फिरण्याची सवय होती, हे सर्व नाशिककरांना माहीत होते. ते खूप मोठा फेरफटका मारुन आले की मग लिखानास सुरुवात करत होते. साधारण रात्री १-२ नंतरच ते लिखान करत होते. राम गणेश गडकरी व विलियम शेक्सपीयर यांची आठवण करुनच ते लिहिण्यास प्रारंभ करत होते. आजही या दोघांचे फोटो त्यांच्या खोलीत आहे.

असे मिळाले तात्यासाहेबांना घर

तात्यासाहेबांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा ते भाड्याच्या घरात राहत होते. त्यावेळी घरमालकास पुन्हा ते घर हवे होते. मग तात्यासाहेबांसाठी घराचा शोध सुरु झाला. नाशिक मनपात तेव्हा रत्नाकर कुळकर्णी प्रशासक होते. ते साहित्य रसिक होते. आम्ही त्यांची भेट घेतली. त्यांनी तरण तलावाजवळ बांधलेले घर देण्याची तयारी दर्शवली. तसा ठराव शासनाकडे पाठवला. परवानगीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट घेतली.

मग पवारसाहेबांनी सर्व यंत्रणेस कामावर लावले. वैयक्तीक नावावर घर देता येणार नव्हते, हे समजल्यानंतर कुसुमाग्रज प्रतिष्ठान तयार झाले. १९९० साली तयार झालेल्या या प्रतिष्ठानामार्फत आज अनेक कामे होत आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानची स्थापना झाल्यावर मी त्यांचा खूप जवळ गेलो. दोन-तीन दिवस गेलो नाही तर हेमा (मला ते या नावानेच बोलवायाचे) का आला नाही? यासारखी विचारणा केली.

त्यांच्या अंतीम समयीसुद्धा मी सोबत होतो. गोदावरी गौरव किंवा जनस्थान पुरस्कार देतांना ते नेहमी सांगत होते, ‘आज माझ्यासाठी सर्वात मोठा सण आहे. कारण मी एका लेखकाचा सन्मान करत आहे. मी गोदावरी गौरवाने देशातील मोठ्या माणसांना नाशिकमध्ये बोलवत आहे. हा आमचा कृतज्ञतेचा नमस्कार आहे.’

घरास घरच राहू द्या

तात्यासाहेबांनी सर्व भाषांवर प्रेम केले. सर्वच माणसांवर व कलाकारांवर प्रेम केले. ते नेहमी म्हणायचे,‘मराठी हे घर आहे तर इतर भाषा खिडक्या आहेत. घरास घरासारखेच राहू द्या. खिडकीला खिडकीच राहू द्या.’ मातृभाषेतून शिक्षणाचे महत्व त्यांनी वारंवार विशद केले. मराठीला उचित सन्मान मिळावा म्हणून त्यांनी अविरत जनजागण केले.

मृत्यूपत्रात केला सर्वांचा विचार

तात्यासाहेब आजारी पडायला लागले. तेव्हा सर्वांना सांगत होते, ‘आता पुढचे शतक मी काही पाहणार नाही.’ ते कवी होते, लेखक होते, नाटककार होते, समाजपुरुष होते, त्यापुढे जाऊन तत्वज्ञानी होते, हेच यातून दिसते. नाशिककरांसाठी ते आकाश होते. सर्वांना समावून घेणारे होते. सर्वांना सावली देणारे वटवृक्ष होते. ते काही श्रीमंत व्यक्ती होते का? अजिबात नाही. त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांनी त्यांच्यासोबत असणाऱ्या प्रत्येकाचा विचार केला. घरातील भांडी घरात जी काम करत आहे, त्या बाईला द्या इतक्या बारीक गोष्टींचा उल्लेख त्यांनी केला होता. असा व्रतस्थ जगणारा माणूस कधी पाहिला नाही.

(लेखक माजी आमदार व उद्योजक आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या