Sunday, May 5, 2024
Homeनगरवैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला, शिष्यवृत्ती मिळेना

वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला, शिष्यवृत्ती मिळेना

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

गुणवत्तेच्या आधारे वैद्यकीय शिक्षणासाठी सहज प्रवेश मिळाला. मात्र शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी एका गरीब व मागासवर्गीय विद्यार्थीनीची तांत्रिक अडचणीमुळे अक्षरश: दमछाक होत आहे. अनेक ठिकाणच्या पाठपुराव्यानंतर ही विद्यार्थीनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना साकडे घालणार आहे. साक्षी ज्ञानेश्वर बनसोडे, रा. साकुरी, तालुका राहाता असे या मागास प्रवर्गातील विद्यार्थीनीचे नाव आहे.

- Advertisement -

याबाबत साक्षीचे वडील ज्ञानेश्वर बनसोडे यांनी सांगितले, बारावी सायन्स नंतर साक्षीने 2022-23 मध्ये नातेवाईकांच्या आश्रयाने कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, वाकड, पुणे येथे प्रथम वर्षाकरता प्रवेश घेतला. त्याच वेळी तिने तेथे पोष्ट मॅट्रीक शिष्यवृत्तीचा फॉर्म भरला. यानंतर अचानक साक्षीचा बीएएमएस प्रथम वर्षाकरता नंबर लागला. आनंदीत झालेल्या साक्षीने तातडीने तेथे प्रवेश घेतला.

साक्षीचा आनंद मात्र दिर्घकाळ टिकला नाही. तेथे शिष्यवृत्तीचा फॉर्म भरता येईना. अगोदर पुणे येथील कॉलेजमध्ये भरलेला शिष्यवृत्तीचा फॉर्म डिलीट केल्याशिवाय हा फॉर्म दाखल करता येईना. पहिला फॉर्म रद्द करण्यासाठी साक्षीने पुण्यातील समाज कल्याण आयुक्त व सहाय्यक आयुक्तांकडे चकरा मारल्या. विनंत्या, आर्जव केली. उपरोक्त अर्जाचे देयक तयार झाले असून हा अर्ज डिलीट करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध नसल्याचे सांगत साक्षी व आपल्याला अपमानीत करून परत पाठवण्यात आल्याचे बनसोडे यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षणाची आस असलेल्या साक्षीने पाठपुरावा सुरू ठेवत मुख्यमंत्री, महिला आयोग, शिक्षण संचालकांसह विविध ठिकाणी पत्र पाठवुन दाद मागितली. तिचा शिष्यवृत्तीचा पहिला अर्ज रद्द झाला नाही तर ती वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशाला मुकणार आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतीम मुदत 30 मे पर्यंत असल्याने साक्षी हतबल झाली आहे. माझे शिक्षण खंडीत झाल्यास मला जगण्यात स्वारस्य राहणार नसल्याचा निर्वाणीचा इशारा तिने देवूनही प्रतिसाद मिळालेला नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले पुढील आठवड्यात शिर्डीत येत आहे. यावेळी त्यांची भेट घेवून त्यांच्यापुढे व्यथा मांडणार असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या