Friday, April 26, 2024
Homeनगरलग्नाच्या जेवणातून विषबाधा

लग्नाच्या जेवणातून विषबाधा

टाकळीमिया (वार्ताहर) –

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे लग्नातील जेवणातून सुमारे 200 ते 250 लोकांना विषबाधा झाल्याची दुर्घटना काल रविवारी

- Advertisement -

दुपारच्या सुमारास घडली. यात राहुरी तालुक्यासह कोल्हार येथील वर्‍हाड असून राहुरी तालुक्यातील बाधा झालेल्यांना उपचारासाठी विवेकानंद नर्सिंग होम व राहुरी येथील ग्रामीण रूग्णालयासह खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात लहान मुले, वृद्ध व महिलांची संख्या अधिक आहे. काही अत्यवस्थ वर्‍हाडींना लोणी येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

दरम्यान, ही विषबाधा कोणत्या अन्नातून झाली? याबाबत माहिती मिळाली नाही. बाधितांची संख्या वाढल्याने अनेक वर्‍हाडी भयभीत झाले आहेत.

दि 3 जानेवारी 2021 रोजी दुपारी येथील एका कुटुंबातील मुलीचा विवाह कोल्हार येथील एका कुटुंबातील मुलाबरोबर टाकळीमिया येथे पार पडला. या लग्नात जेवणाच्या पंगती पार पडत होत्या. याच जेवणावळीतून दुपारनंतर अनेकांना उलटी, मळमळ अशाप्रकारचा त्रास जाणवू लागला. यात मोठी माणसे, महिला व लहान मुलांचा समावेश आहे.

टाकळीमिया येथील सर्वांना उपचारासाठी राहुरी फॅक्टरी येथील नर्सिंग होम येथे तसेच काहीजणांना राहुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार चालू आहेत. उपचारासाठी दाखल झालेले 50 ते 60 जण असले तरीही या लग्नातून जेवण करून गेलेल्या बाहेरगावच्या पै-पाहुण्यांची काय परिस्थिती आहे? ते समजू शकले नाही. त्यामुळे बाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज 200 ते 250 जणांचा असलातरी ही संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.

सध्या राहुरी फॅक्टरी येथील नर्सिंग होममध्ये काही जणांना जास्त त्रास जाणवू लागल्याने त्यांना लोणी येथील विखे पाटील दवाखान्यात हलविण्यात आल्याचे समजते. बाधित रुग्णांना राहुरी कारखाना येथील नर्सिग होम, प्रवरा हॉस्पिटल लोणी, राहुरी ग्रामीण रुग्णालय, राहुरीतील लहान मुलांचे डॉ.प्रकाश पवार, डॉ. नेहे, डॉ. वने, डॉ. म्हस्के तसेच डॉ. संदिप कुसळकर आदी डॉक्टरांनी बाधित रुग्णांवर उपचार केले.

यावेळी नर्सिग होमचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लहारे, डॉ. कड, डॉ. वाघमारे, अक्षय निकम, एम. डी. स्टॅप सिस्टर जर्‍हाड, सरोदे, डॉ. अश्विन दिघोरे, अक्षय कस्तुरवार, प्रतिक शवंते, कार्तिकी आघाव, स्नेहल घाडगे, शिवानी लव्हाळे, काजल मोडवे, रुचिका भागवत, प्रिया बोधले, अश्पाक सय्यद, विजय गवळी, भगवान कोबरणे, प्रविण बारहाते आदींनी रूग्णकार्यात मदत केली.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांची टाकळीमियाला भेट

अहमदनगर (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे लग्न समारंभात अन्नातून विष बाधा झाल्याचे कळाल्यानंतर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे हे त्यांच्या पथकासह रात्री आठ वाजता टाकळीमिया या ठिकाणी पोहचले. त्याठिकाणी माहिती घेवून आरोग्य यंत्रणेला सुचना दिल्या.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांच्यासोबत अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. काकडे, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. नागपूरकर यांच्यासह राहुरीच्या तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. त्यांनी टाकळीमियाँ प्राथमिक आरोग्य केंद्रासह राहुरी कारखाना येथील विवेकानंदन नर्सिंग होम या ठिकाणी भेट देवून सुरू असलेल्या उपचाराची माहिती दिली. तसेच घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासनाला दिली. दरम्यान, आरोग्य खात्याने लग्न समारंभातील अन्नाचे नमुने घेतले असून अन्न व औषध प्रशासन विभाग देखील स्वतंत्रपणे नमुने घेणार असल्याचे डॉ. सांगळे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या