नगरच्या अमरधाममध्ये दुसरी विद्युतदाहिनी कार्यान्वित

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनामुळे मागील तीन महिन्यांपासून शहरासह जिल्ह्यात मृत्युचे प्रमाण वाढले आहे. शहराबरोबरच जिल्ह्यातील रुग्ण शहरातील रुग्णालयामध्ये उपचाराकरिता येतात.

यात काहींचा मृत्यू होता, शासनाच्या आदेशानुसार कोव्हिड बाधित रुग्ण ज्याठिकाणी मृत पावतात त्याठिकाणीच त्यांचा अंत्यविधी केला जातो.

नगरच्या नालेगावमध्ये अंत्यविधीसाठी एकच विद्युतदाहिनी आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्यांवर तेथे अंत्यविधी केला जात आहे. यामुळे अंत्यविधीचे प्रमाण वाढल्याने या विद्युत दाहिनीवर ताण येत होता. त्यामुळे मंगळवारपासून दुसरी विद्युत दाहिनी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अमरधामबाबत कोणीही राजकारण करू नये, असे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले.

नालेगाव अमरधाममध्ये करोनाबाधित मयत रुग्णावर अंत्यसंस्कार रिकाम्या जागेवर झालेल्या प्रकाराबाबत महापौर वाकळे यांनी तातडीने बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आयुक्त श्रीकांत मायकलवार, शहर अभियंता सुरेश इथापे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, अजय चितळे, वैभव वाघ, गजेंद्र दांगट, राजू वामन, राम वाघ, अमरधामचे व्यवस्थापक स्वप्निल कुर्हे आदी उपस्थित होते.

शहरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत आहे. यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. नालेगाव अमरधाम क्षेत्रफळ पाहता ते अपुरे पडत आहे. तसेच नालेगाव अमरधाम येथे संपूर्ण जिल्ह्यातील अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या भितीची भावना निर्माण झाली आहे.

यामुळे, नालेगांव अमरधाम रेथे नगर शहरातील अंत्यविधी करण्यात यावी अन्यथा अंत्यविधी बंद करण्याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा परिसरातील नागरिकांसमवेत अमरधाम येथे गेटबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नालेगाव ग्रामस्थांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर महापौर यांनी मंगळवारी दुसरी विद्युत दाहिनी बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

नालेगाव येथील ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, अंत्यविधी मोठ्याप्रमाणात होत असल्याने धुराचे लोट नालेगांव गावठाण, सुडके मळा, बागरोजा हाडको, दिल्लीगेट, पटवर्धन चौक, कल्याण रोड परिसर, ठाणगे मळा इत्यादी परिसरात पसरत आहे.

सध्याचे वातावरण व करोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता सर्व परिसरातील नागरिकांच्या मनात भितीची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे मनपाने दुसरी विद्युत दाहिनी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मृतांची हेळसांड होणार नाही,असे महापौर वाकळे यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *