Thursday, April 25, 2024
Homeनगरराहुरीकरांना फसविणार्‍या माजी आमदारांनी बेछूट आरोप करू नयेत

राहुरीकरांना फसविणार्‍या माजी आमदारांनी बेछूट आरोप करू नयेत

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी शहरातील सुधारित पाणी योजनेचे तत्वतः मान्यतेचे पत्र घेऊन निवडणुकीच्या तोंडावर राहुरीकरांना फसविणार्‍या माजी लोकप्रतिनिधी यांना शहरवासीय चांगले ओळखतात. स्वतः काही करायचे नाही व फुकटचे श्रेय घेत असल्याचा आरोप इतरांवर करायचा, या करामतीला आता राहुरीकर भुलणार नाहीत. असा सणसणीत टोला राहुरीचे मावळते नगराध्यक्ष अनिल कासार यांनी माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांना लगावला आहे.

- Advertisement -

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात माजी आमदार कर्डिले यांनी केलेल्या आरोपांना त्यांनी सडेतोड उत्तरे दिली आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर ना. प्राजक्त तनपुरे यांनी स्वतः पाठपुरावा करून तत्वतः मान्यतेचे गौडबंगाल तपासले व त्यानंतर तांत्रिक मंजुरी व इतर बाबी अधिकार्‍यांसमोर ठेवून नवीन सुधारित 29 कोटी रुपयांची पाणीयोजना मंजूर करून घेतली. बुर्‍हानगरच्या पाणीपुरवठा योजनेतून शेतीसाठी गैरमार्गाने पाणी घेणार्‍यांनी ना. तनपुरे यांच्यावर आरोप करणे हास्यास्पद आहे. नागरदेवळे येथील जनतेचीच तेथे नगरपालिका व्हावी, अशीच इच्छा व्यक्त होत असताना यातून विकासासाठी मोठा निधी उपलब्ध होऊन सुधारणा होतील, यामुळे आग्रहास्तव ना. तनपुरे पाठपुरावा करत आहेत. राहुरी पालिका गेल्या चाळीस वर्षापासून ना. तनपुरे यांच्या घराण्याच्या ताब्यात आहे. ती केवळ राहुरीकरांचा दृढ विश्वास व नगर परिषदेच्या माध्यमातून मिळणार्‍या सेवा तसेच विकास कामांच्या माध्यमातूनच नगर परिषदेची सत्ता येथील जनतेने अबाधित ठेवली आहे.

राहुरी नगरपरिषदेचे शासकीय पातळीवर कोणतेही देणे नसून वेळेवर वीजबिल व पाणीपट्टी भरणारी व त्यामुळे संबंधित बिलातून रिबेट घेणारी एकमेव पालिका राहुरी आहे. राहुरी पालिकेवर थकबाकी नसून कामगारांना एक तारखेला वेतन तसेच निवृत्त्तीनंतर त्याच दिवशी सर्व रक्कम देणारी राहुरी पालिका आदर्श असून याचे श्रेय केवळ तनपुरे यांच्या योग्य नियोजनाला जाते. त्यामुळे जनतेने नाकारलेल्या माजी लोकप्रतिनिधींनी आपले अपयश झाकण्यासाठी बेछूट आरोप इतरांवर करू नये, असा सल्ला कासार यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे. यावेळी नगरसेवक सूर्यकांत भुजाडी, नंदकुमार तनपुरे, प्रकाश भुजाडी, विलास तनपुरे, बाळासाहेब उंडे, अशोक आहेर, संजय साळवे, गजानन सातभाई आदींनी प्रसिद्धी पत्रकास दुजोरा दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या