Thursday, April 25, 2024
Homeनाशिकमातीचा भराव थेट गोदापात्रात टाकल्याने सभापतींकडून प्रकरणाची गंभीर दखल

मातीचा भराव थेट गोदापात्रात टाकल्याने सभापतींकडून प्रकरणाची गंभीर दखल

नाशिक l Nashik (प्रतिनिधी)

शहरातील आनंदवली शिवारात एका बांधकाम व्यावसायिकाने इमारत बांधकामा दरम्यान खोदलेल्या मातीचा भराव थेट गोदापात्रात टाकून नदीपात्र अरुंद केल्यामुळे मनपाचे स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेतली आहे.

- Advertisement -

गिते यांनी यासंदर्भात नगररचना विभागाला पत्र दिले असून, या बांधकामाच्या परवानगी बाबत सखोल चौकशी करण्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

पत्रात म्हटले आहे कि, महापालिका हद्दीत आनंदवली शिवारातील गट नंबर ६५/१/१/अ ही जागा गोदावरी नदीपात्रा लगत आहे. याठिकाणी रेव्हिरा टॉवर नावाच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामा दरम्यान खोदकाम करताना निघालेली माती थेट गोदापात्रात टाकली जात आहे.

त्यामुळे नदीपात्र अरुंद तर होत आहेच शिवाय नदीची खोली देखील कमी होत आहे. तसेच, नदीचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आला असून, नदीच्या सौंदर्याला बाधा पोहचत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन झालेले आहे.

याबाबत आणि बांधकामाबाबत संबंधित बांधकाम व्यावसायिकाने मनपाची रितसर परवानगी घेतलेली आहे का, याची सखोल चौकशी करण्याचे या पत्रात म्हटले आहे.

विशेष म्हणजे यापूर्वीदेखील यासंदर्भात पत्र देण्यात आले होते, मात्र त्याबाबत काय कारवाई केली याची माहिती देण्यात न आल्याने स्थायी समितीने पुन्हा पत्र दिले आहे.

त्यामुळे नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी करावी, सदर बांधकाम नियमबाह्य आढळल्यास त्वरित हे काम थांबविण्यात यावे, तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल उलट टपाली स्थायी समितीला सदर करावा, असेही या पत्रात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या