Friday, April 26, 2024
Homeनगरमाथाडी कामगारांना पाच लाखांचे विमा कवच

माथाडी कामगारांना पाच लाखांचे विमा कवच

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील 2 हजार 410 नियमित पगार घेणार्‍या माथाडी कामगारांना माथाडी कामगार मंडळाकडून पाच लाख रुपयांचा अपघात विम्याचे कवच देण्यात येणार आहे.

- Advertisement -

त्याचसोबत एक लाखापर्यंत वैद्यकीय खर्चासाठी विमा योजना लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हा हमाल पंचायत अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सहचिटणीस कामगार नेते अविनाश घुले यांनी दिली.

यापूर्वी माथाडी कामगारांना 3 लाखांचा अपघात विमा व 75 हजारांपर्यंत वैद्यकीय विमा योजना घेण्यात आली होती. परंतु वाढत्या महागाईचा विचार करता माथाडी मंडळाचे अध्यक्ष सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत यांच्याकडे पाठपुरावा करून जिल्ह्यातील माथाडी कामगारांसाठी विमा योजनेची रक्कम वाढविण्याची मागणी करण्यात आली होती.

त्यास माथाडी मंडळाचे अध्यक्ष कामगार आयुक्त राऊत यांनी मंजुरी देऊन 14 डिसेंबरपासून माथाडी कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियास पाच लाखांचा अपघात विमा व 1 लाखापर्यंत वैद्यकीय खर्चासाठी विमा योजना लागू करून या विमा योजनेचा संपूर्ण हप्ता माथाडी मंडळाने भरला आहे.

याकामी माथाडी मंडळाचे निरीक्षक सुनील देवकर यांचे सहकार्य लाभले असल्याचे घुले यांनी सांगितले. नगर शहर व जिल्ह्यातील मार्केटयार्ड, किराणा ग्रोसरी बाजार, ट्रान्सपोर्ट, रेल्वे मालधक्के, वेअरहाऊस, शासकीय व निमशासकीय गोदामे यामध्ये काम करणार्‍या कष्टकरी कामगारांना माथाडी कायद्याचे संरक्षण मिळाले आहे.

या कायद्यामुळे कामगारांचे जीवनात स्थैर्य प्राप्त झाले असून त्यांचे जीवनमान उंचावले आहे. माथाडी मंडळात नोंदीत असणार्‍या व नियमित पगार घेणार्‍या माथाडी कामगारांना शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे रजा, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, दिवाळी बोनस, वैद्यकीय सुविधा, आपतकालीन आर्थिक मदत, विमासुरक्षा यासह राज्य सरकारने लागू केलेल्या विविध फायद्यांचा लाभ मिळत असल्याची माहिती घुले यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या