Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारधक्कादायक : खाजगी कोविड सेंटरमधील साहित्य रस्त्यावर

धक्कादायक : खाजगी कोविड सेंटरमधील साहित्य रस्त्यावर

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

नंदुरबार-उमर्दे खुर्दे रस्त्यावर खाजगी कोविड सेंटरमधील साहित्य व कोविड रूग्णांचे मास्क व इतर साहित्य तीन किलोमीटरपर्यंत अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या वेळी फेकलेले आढळून आले आहेत.

- Advertisement -

इतकेच काय तर नंदुरबार-उमर्दे रस्त्यावरील तालुका पोलीस ठाण्यासमोरही हे साहित्य दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग परिसरातील नागरीकांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत प्रशासनाने कारवाई करत हे कृत्य करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरीकांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबारपासून उमर्दे खुर्दे हे गांव सात कि.मी.अंतरावर आहे. या रस्त्यावरच भालेर, कोपर्ली असे जवळपास २० ते २५ गावातील नागरीकांचे या रस्त्यावरून येणे जाणे आहे.

काल दि.१६ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास खाजगी दवाखान्यातील अज्ञात व्यक्तींनी दवाखान्यात जमा केलेला जैविक कचरा रस्त्यावर फेकून दिला. त्यामुळे नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यापासून ते तीन कि.मी.पर्यंत हा कचरा रस्त्याच्या आजुबाजूला फेकलेला आढळून आला.

रात्रीच्यावेळी अज्ञात व्यक्तीने चक्क नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याजवळही कचरा फेकलेला आहे. हवेमुळे हे साहित्य सर्वत्र पसरुन कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.

सध्या कोरोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणावर वाढली आहे. खाजगी दवाखान्यांमध्ये मोठया प्रमाणावर कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्याठिकाणी जमा झालेल्या कचर्‍याची शासकीय नियमाप्रमाणे विल्हेवाट न लावता तीन कि.मी.परिसरात फेकण्यात आल्याचे दिसून येत आहे.

यात हातमोजे, इंजेक्शन, मास्क, सलाईनच्या बाटल्या, उरलेले फुड पॅकेज यासह विविध आढळून आले. या परिसरातील दुर्गंधी सोबतच नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

एकीकडे प्रशासन सोशल डिस्टन्सिंग ठेवा, आरोग्याची काळजी घ्या, असे सांगत असतांना खाजगी दवाखान्याकडून जैविक कचर्‍याची विल्हेवाट न लावता असा प्रकार घडत असल्याने नागरीक कसे सुरक्षित राहतील, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

रात्रीच्या या घटनेमुळे परिसरातील नागरीकांनी प्रचंड संताप व्यक्त होत आहे. अज्ञात व्यक्तीने केलेल्या या कृत्याची प्रशासनाने तपास करून अज्ञात व्यक्तीवर व जबाबदार असलेल्या दवाखान्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या