Saturday, April 27, 2024
Homeनगरमातापूर येथील दरोड्याची घटना पोलिसांच्या सतर्कतेने टळली

मातापूर येथील दरोड्याची घटना पोलिसांच्या सतर्कतेने टळली

वडाळा महादेव |वार्ताहर| Vadala Mahadev

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या रात्रीची गस्त घालणार्‍या पोलिसांच्या सतर्कतेमुळे श्रीरामपूर तालुक्यातील मातापूर येथील दरोड्याची घटना टळली. पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे नागरिकांनी कौतूक केले आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप, उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांचे मार्गदर्शनाखाली परिसरात रात्रीची गस्त सुरू आहे. भुरट्या चोरांचा प्रादुर्भाव वाढल्याने पोलीस कर्मचारी येथील ग्रामस्थांच्या मदतीने परिसरामध्ये गस्त घालत असताना गुप्त माहितीद्वारे मातापूर येथे काही इसम दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार यांनी विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मातापूर येथे पोहोचताच सदर लोकवस्तीवरील नागरिकांनी पोलीस कर्मचारी महेश पवार व इतर नागरिकांचे आभार मानले.

यावेळी दरोड्याच्या तयारीत असलेल्या इसमांनी दरवाजास बाहेरून कडी लावून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी दुसर्‍या दिवशी शुभ कार्य असल्याने येथे चोरीचा प्रयत्न घडला. परंतू सध्या परिसरात गस्त सुरू असल्याने नागरिकांनी तात्काळ पोलीस कर्मचारी यांना माहिती दिली. त्यामुळे अनर्थ टळला.

सध्या जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे तसेच उपअधीक्षक संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर हद्दीत अशोकनगर पोलीस चौकी अंतर्गत हद्दीतील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, प्रतिष्ठित व्यक्तींची पोलिसांच्या मदतीने प्रत्येक दिवशी शासकीय वाहनांमधून परिसरात गस्त सुरू आहे.

काल दरोड्याचा प्रकार हाणून पाडल्याने मातापूर ग्रामस्थांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप, उपनिरीक्षक समाधान सुरवाडे, संभाजी पाटील, पोलीस नाईक संजय दुधाडे, किरण पवार, महेश पवार, लक्ष्मण सांगळे, राजेंद्र देसाई, पोलीस मित्र गणेश गायकवाड, सोमनाथ भोंडगे यांचे आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या