चोरून दुसरे लग्न केले; पतीसह 10 जणांवर गुन्हा दाखल

jalgaon-digital
4 Min Read

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

पहिली पत्नी हयात असताना व तिची पूर्वपरवानगी न घेता चोरून दुसरे लग्न केले म्हणून पहिल्या

पत्नीने पती विरुध्द फिर्याद दाखल केली असून नेवासा पोलीस ठाण्यात पतीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव येथील उषा संदीप कुर्‍हाडे (वय 33) हल्ली रा.फुलारी वस्ती भेंडा बुद्रुक या विवाहितेने फिर्याद दिली की, माझे पती व घरच्यांनी त्रास दिल्यामुळे मी सध्या भेंडा येथे माझे वडील मोतीराम चिमाजी शिंदे यांचेकडे मुलाबाळांसह राहत असून सहा महिन्यांपासून राहण्यास आहे.

माझे पती घरी आले तेव्हा मला विनाकारण शिवीगाळ दमदाटी करून म्हणाले की तुला माहेरुन 5 लाख रुपये आणायचे सागितले होते, ते पैसे का घेऊन आली नाही? या कारणावरून मला मारहाण केली. माझे लग्न आई-वडिलांनी दि. 27 मार्च 2005 रोजी सहमतीने हिंदू रितीरीवाजाप्रमाणे झाले असून त्यात सर्व भांडी-कुंडी तसेच थाटामाटात करून दिले होते.

त्यांनी मला चांगले नांदविले.त्यानंतर मला दोन मुले झाली. आम्ही संसार करत असताना 2011 पासून माझे सासरचे लोक मला त्रास देऊ लागले. त्यावेळी मी माझे आई-वडिलांना सांगत होते. त्यावेळी माझे आई-वडील ‘तुझे आज ना उद्या बरे होईल’ अशी समजूत काढून सासरी नांदविण्यास पाठवित होते.

त्यानंतर दि.11 डिसेंबर 2011 रोजी मी प्लाट घेण्यासाठी 5 लाख रुपये माहेरून आणावेत या कारणाकरिता त्यांनी मला घराबाहेर काढून दिले. त्यावर माझ्या वडिलांनी उसने पासणे करून 2 लाख रुपये आणून दिले व समजावून सांगितले की यापुढे पैसे देण्याची माझी ऐपत नाही.

ते वारंवार पैशाच्या कारणावरून मला शारीरिक व मानसिक त्रास देऊन वेळोवेळी उपाशीपोटी ठेऊन घराबाहेर काढून देत होते. त्यावेळी आमचे नातेवाईक तसेच प्रतिष्ठित व्यक्तींनी मध्यस्थी करून आमची समजूत घातली होती.

त्यावेळी ते मला वारंवार त्रास देत होते.तसेच माझी नणंद वर्षा दिलीप शिंदे व तिचे पती दिलीप शामदास शिंदे रा. आश्वी,ता. संगमनेर हे दिवाळीच्या व उन्हाळ्याच्या सुट्टीत आल्यानंतर माझ्या भावाने सांगितल्याप्रमाणे तुझ्या आई-वडिलांकडून पैसे घेऊन ये असे म्हणुन वारंवार त्रास देत होते. दि . 10 मे 2020 रोजी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास माझा नवरा संदीप हा दारू पिवुन आला व मला शिवीगाळ करू लागला.

मी त्याला म्हणाले तुम्ही मला शिवीगाळ करू नका. त्यावेळी तेथे आलेले माझी नणंद व नंदाई म्हणाले तिला घराबाहेर काढून द्या, त्यानंतर मला घराबाहेर काढले. माझी मुले त्याच्याकडे ठेवून घेतल्याने मी दि. 16 मे 2020 रोजी सासरी मुलाला घेण्यासाठी गेले असता नणंद, नंदाई व सासू-सासरे यांनी मला मारहाण केली. तसेच माझ्या मुलाचे आधार कार्ड व जन्माचे दाखले त्यांनी ठेवून घेतले. माझ्या अंगावरील दोन तोळे सोन्याचे दागिने काढून घेतले. ते मी मागितले असता मला त्यांनी देण्यास नकार दिला.

जून 2020 मध्ये माझा भाऊ नितीन यास समजले की माझा नवरा संदीप याने मी हयात असतानासुद्धा माझी कुठलीही पूर्व परवानगी न घेता जून महिन्यात करजगाव, ता. चाळीसगाव, जि.जळगाव येथील नानासाहेब राजाराम गायकवाड यांची मुलगी शीतल हिच्याशी परस्पर लग्न करून हंडीनिमगाव येथे आणले आहे.

म्हणून माझी माझे पती संदीप वसंत कुर्‍हाडे, सासरे वसंत मारुती कुर्‍हाडे, सासू सुमन वसंत कुर्‍हाडे, दीर सतिष वसंत कुर्‍हाडे, जाव कल्याणी सतिष कुर्‍हाडे (पाचही जण रा. हंडीनिमगाव ता. नेवासा) नणंद वर्षा दिलिप शिंदे, नंदाई दिलीप रामदास शिंदे (दोघे रा. संगमनेर) नानासाहेब गायकवाड (दुसर्‍या पत्नीचे वडील), सखुबाई गायकवाड (दुसर्‍या पत्नीची आई), शीतल नानासाहेब गायकवाड (दुसरी पत्नी) (तिघे रा. चाळीसगाव जि. जळगाव) यांचेविरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे.

या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी वरील 10 जणांवर गुन्हा रजिस्टर फर्स्ट 821/2020 भारतीय दंड विधान कलम 498 (अ), 494, 406, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हवालदार श्री. मरकड करत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *