Tuesday, April 23, 2024
Homeनगरलॉन्स व मंगल कार्यालये सुरू करा

लॉन्स व मंगल कार्यालये सुरू करा

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

मंगल कार्यालये व लॉन्स सुरू करण्यास शासनाने परवानगी द्यावी, या मागणीसाठी लॉन्स व मंगल कार्यालय चालक मंडप डेकोरेटर्स केटरिंग बॅण्ड संघटनेची संगमनेरात बैठक झाली.

- Advertisement -

विविध मागण्यांवर चर्चा होऊन राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर-अकोलेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज सोमवार दि. 5 ऑक्टोबर रोजी भेट घेणार आहे, अशी माहिती संगमनेर लॉन्स व मंगल कार्यालय असोसिएशनचे अध्यक्ष गोरख वसंतराव कुटे, अकोलेचे अध्यक्ष रोहिदास धुमाळ यांनी दिली.

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार 200 लोकांना ,महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार 100 लोकांना तर अहमदनगरच्या मा. जिल्हाधिकाऱी यांचे आदेशानुसार फक्त 50 लोकांना विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यास परवानगी आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. सदरचा संभ्रम दूर झाला पाहिजे, अन्यथा जानेवारीपासून मंगल कार्यालय चालक पुढील बुकिंगवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

मंगल कार्यालय लॉन्स याठिकाणी विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी 500 ते 1000 लोकांना परवानगी द्यावी. ग्रामपंचायतीने व नगरपालिकेने सर्व कर माफ करावेत, बँकांनी कर्जाचे हप्ते भरण्यास मुदतवाढ द्यावी, करोना काळातील वीज बिल माफ करावे, या मागण्या मांडण्यात आल्या. या बैठकीला संगमनेर-अकोले तालुक्यातील सर्व मंगल कार्यालय,लॉन्स चालक केटरर्स, मंडप, लाईट डेकोरेशन,फ्लॉवर डेकोरेटर्स पॅकेज, सनई-चौघडा अशा विविध असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

एका लग्न सोहळ्यात सुमारे 150 ते 350 कुटुंबाना रोजगार मिळतो. त्यामुळे सरकारने जर परवानगी दिली तर लाखो लोकांना रोजगार मिळू शकतो. थांबलेले अर्थचक्र वेगाने फिरू शकते त्याचा फायदा अप्रत्यक्षरित्या सरकारला कर रूपाने होणार आहे. याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा,असे यावेळी सांगण्यात आले.

या बैठकीस संगमनेर शहर तालुका लॉन्स, मंगल कार्यालय असोसिएशनचे अध्यक्ष गोरख वसंतराव कुटे, उपाध्यक्ष रामनाथ कुर्‍हे, सचिव अनिल राऊत तसेच अकोले मंगल कार्यालय असोसिएशन अध्यक्ष रोहिदास धुमाळ, उपाध्यक्ष प्रवीण झोळेकर, सचिव संतोष नवले तसेच मंडप डेकोरेशनचे अध्यक्ष सुखदेव जोंधळे आदींसह सर्व लॉन्स व मंगल कार्यालय चालक-मालक व विविध संघटनेचे सर्व सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.

राज्य सरकार 150 चौरस फूट आकाराच्या एसटी बसमध्ये 50 प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देते मग दहा हजार ते वीस हजार चौरस फूट पासून ते दोन एकर क्षेत्रफळ असलेल्या मंगल कार्यालयात विवाहासाठी 500 ते 1000 लोकांना किंवा हॉल क्षमतेच्या 50 टक्के लोकांना उपस्थित राहण्यासाठी परवानगी का देत नाही? असा सवाल लॉन्स व मंगल कार्यालय चालक मंडप डेकोरेटर्स केटरिंग बँड संघटनेने केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या