Wednesday, April 24, 2024
Homeनाशिक...अखेर पाच रुपयांची पावती रद्दची नामुष्की

…अखेर पाच रुपयांची पावती रद्दची नामुष्की

नाशिक : प्रतिनिधी

पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या कल्पनेने करोनाचा बिमोड करण्यासाठी मेनरोडसह बाजारपेठेत खरेदीसाठी नागरीकांना तासाला पाच रुपयांची पावती देण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र हीच पावती घेण्यासाठी गर्दी होत असल्याने आणि सोशल डिस्टन्स पाळले जात नसल्याने पावती फाडण्याच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जात होता. त्यामुळे पावती फाडण्याचा हा कार्यक्रम तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे…

- Advertisement -

त्यामुळे तात्पुरता विचार करुन घेतलेले निर्णय अशाप्रकारे मागे घेण्याची नामुष्की ओढावते, असे बोलले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील तोबा गर्दी होणार्‍या बाजारपेठांमध्ये पाच रुपये आकारणी करत सशुल्क प्रवेश देण्याचा प्रयोग पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी मनपाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यास दोन दिवसांपूर्वी सुरुवात केली होती.

यावेळी तिकीट काऊंटरवर पाच रुपयांसह पावतीच्या देवाणघेवाणमध्ये लागणारा वेळ, यामुळे सोशल डिस्टन्स धोक्यात सापडत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे पाच रुपये आकारणीला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचे आदेश दीपक पांडे यांनी जाहीर केले.

अपुर्‍या मनुष्यबळामुळे सुरक्षित वावर राखणे, सर्व ग्राहकांना रोखणे शक्य होत नसल्याने तुर्तास सशुल्क प्रवेशाचे निर्बंध शिथिल करण्यात आला आहे. आता खरेदीसाठी एक तासाची वेळमर्यादा ’जैसे- थे’ असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेतर्फे ई-स्वरुपात चलन फाडून प्रिंटेड तिकिट देण्याची यंत्रे उपलब्ध होताच पुन्हा पाच रुपये आकारणी सुरु केली जाणार असल्याचे पाण्डेय यांनी सांगितले आहे.

गुरुवारी तुफान गर्दी

शहर पााेलीस, मनपा प्रशासन गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कितीही उपाय याेजत असले तरी, ते उणेच असल्याचा प्रत्यय गुरवारी दुपारनंतर मेनराेड, धुमाळ पाॅइंट, रविवार कारंजा, सराफ बाजार येथे महिलांसह नागरिकांची प्रचंड गर्दीने पाहायला मिळाला. नागरिक सैरावैरा पळत असल्याचे दिसून आले. साेशल डिस्टन्सचे तीनतेरा वाजले. सर्वच नियम, निर्बंध कागदाेपत्रीच असल्याचे या गर्दीवरुन दिसून आले. यंत्रणाही हतबल झाली आहे का याचीही प्रचिती गर्दीवरुन आली.

आता मोफत टोकन पोलिसांकडून दिले जाईल. बाजारातून परतणार्‍यांचे टोकन तपासले जाईल.

– सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत बाजारपेठेत प्रवेश दिला जाईल.

– एक तासापेक्षा जास्त वेळ थांबल्यास पाचशे रुपये दंड होऊ शकतो

– सुरक्षित वावर किंवा मास्क नसल्यास पाचशे रुपये दंड.

– बाजारपेठेत थुंकताना किंवा धुम्रपान करताना आढळल्यास १ हजारांचा दंड

- Advertisment -

ताज्या बातम्या