पावसाने झेंडू, शेवंती फुलांची नासाडी

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दसरा-दिवाळी सण, उत्सवात झेंडू आणि शेवंती या फूल पिकाला मोठी मागणी असते. नगर, पारनेर तालुक्यांतील अनेक शेतकरी फूल शेती करतात.

मात्र, यंदा परतीच्या पावसाने नगर, पारनेरसह जिल्ह्यातील विविध भागातील झेंडू, शेवंती फुलांची नासाडी झाल्याचे चित्र आहे. यामुळे यंदा जवळपास 70 टक्के फूल शेतीचे नुकसान झाले आहे. आवक नसल्याने किरकोळ बाजारात फुलांचे भाव दुप्पट होतात.

नगर तालुक्यातील अकोळनेर तर फुलांचे आगार म्हणूनच ओळखले जाते. यंदाही शेतकर्‍यांनी झेंडू, शेवंतीची लागवड केली. यंदा परतीच्या पावसाने सगळीकडेच पिकांची नासधूसच केली आहे. शेतकर्‍यांनी करोनाचे सावट असूनही फूल शेती केली. मात्र अतिवृष्टीने सारी फूल शेती उद्ध्वस्त झाली. फुले भिजल्याने ती फेकून देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. यंदा भाव चांगला असूनही फुलांची नासधूस झाल्याने उत्पादन खर्चही निघाला नाही.

फुलांची प्रचंड नासाडी झाली असून नगर आणि तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला झाला आहे. त्याचा फटका फुलशेतीला बसला. निम्म्यापेक्षा अधिक फुले शेतातच सडली. बाजारातील आवक घटली अन् फुलांनी गतवर्षापेक्षा दुप्पटीने भाव खाल्ला. बाजार समिती आवारात 100 रुपये असणारा झेंडू किरकोळ बाजारात मात्र दोनशे रुपये किलो विकत आहे. शेवंतीचे भाव बाजार समितीत 200 रुपये किलो तर किरकोळ बाजारात 400 रुपये किलो आहेत.

यंदा फुलांचे स्टॉल घटले

यलो पितांबर, यलो कलकत्ता, भगवा एफ-5 या प्रकाराची झेंडू फुले बाजारात विक्रीस आली आहेत. सेंट व्हाईट, गावरान राजा, पोर्णिमा व्हाईट, पेपर व्हाईट या प्रकारची शेवंतीची फुले बाजारात विकली जात आहेत. फुलांची आवक घटल्याने यंदा चौकाचौकांत दिसणार्‍या फुलांच्या स्टॉलची संख्याही घटली आहे. ठराविक फुलं विक्रेते शहर व उपनगरात बसल्याचे दिसून आले.

बाजारपेठेत विविध ऑफर्स

करोना सावटात शहराची आणि जिल्ह्याची विस्कटलेली आर्थिक घडी रूळावर आणण्यासाठी दसर्‍याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत विविध ऑफर्सची धूम सुरू आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसर्‍याला ग्राहक ओढीसाठी सोन्यावर चांदी मोफत, गाडी खरेदीवर डिस्काउंट, सर्व्हिसिंग फ्री आणि कापडबाजारात फ्री अशा ऑफर्सचा बाजार बहरला आहे. मुहुर्ताचा आजचा रविवार नगरच्या बाजारपेठेला संजीवनी देणारा ठरेल, अशी आशा व्यापारी वर्गालाआहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *