Friday, April 26, 2024
Homeनगरझेंडूच्या फुलांना कवडीमोल भाव; शेतकर्‍यांच्या पदरी निराशा, फुले फेकून देण्याची वेळ

झेंडूच्या फुलांना कवडीमोल भाव; शेतकर्‍यांच्या पदरी निराशा, फुले फेकून देण्याची वेळ

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात पावसाचे प्रमाण जेमतेम राहिल्याने शेतकरी फूल शेतीकडे वळले आहेत. मात्र मंगळवारी विजयादशमीच्या दिवशी शेवगावच्या बाजारात फुलांची विक्रमी आवक झाल्याने झेंडूला कवडीमोल भाव मिळाला. यामुळ शेतकर्‍यांना तसेच अनेक विक्रेत्यांना फुले फेकून द्यावी लागल्याचे चित्र होते. दरवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने दसरा-दिवाळीच्या काळात फुलांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याने फुलांची बाजारात जेमतेम आवक दिसून येते. परिणामी शंभर ते दीडशे रुपये किलो भावाने फुलांची विक्री होते.

- Advertisement -

मात्र यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले त्यामुळे यंदा बाजारात फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. शहरातील मिरी रस्ता, आंबेडकर चौक, क्रांती चौक, बस स्थानक चौक तसेच सार्वजनिक वाचनालयाच्या परिसरातील जुनी भाजी मंडईच्या येथे अनेक विक्रेते फुलांचे ढीगारे घेऊन बसले होते. सकाळी चाळीस रुपये प्रति किलो असणारा भाव दुपारनंतर अवघा दहा रुपये किलोपर्यंत खाली आला. सिमोल्लंघनाची वेळ नजीक येऊन ठेपली मात्र मोठ्या प्रमाणात फुले शिल्लक राहिल्याने अनेकांना आपली फुले फेकून देण्याची वेळ आल्याचे अनेकांनी सांगितले.

शहरातील फूलविक्रेते प्रदीप भडके यांनी सांगितले, दरवर्षी फुलांच्या विक्रमी विक्रीमुळे आमच्या कुटुंबियांचा दसरा दिवाळीचा सण साजरा होतो. मात्र यंदा फुलांना अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यामुळे आम्हाला व आमच्या कुटुंबाला चटणी भाकरी खाऊन यंदाची दसरा दिवाळी सण साजरा करण्याची वेळ आली आहे. एकंदरित मंगळवारी दसर्‍याच्या दिवशी एकीकडे फुलांची विक्रमी आवक तर दुसरीकडे अत्यल्प भावात फुलांची विक्री करण्याची वेळ विक्रेत्यांवर आल्याने त्यांच्यातून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या