Thursday, April 25, 2024
Homeअग्रलेखउत्तर महाराष्ट्रासाठी आनंद पर्वणी!

उत्तर महाराष्ट्रासाठी आनंद पर्वणी!

‘करोना’ करणीने जगात आतापर्यंत बरीच उलथापालथ घडवली आहे. त्यातून जनता पुरेशी सावरलेली नाही. सर्व गोष्टी पूर्वपदावर यायला अजून किती काळ जावा लागेल हे निश्चित नाही.

संसर्गाच्या भीतीमुळे सभा-संमेलनांचे आयोजन आणि उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा पडल्या आहेत. अशा स्थितीत मराठी भाषा आणि मराठी साहित्यप्रेमी माणसांना ओढ लावणारा मराठी साहित्य सारस्वतांचा मेळा अर्थात साहित्य संमेलन यंदा होणार का? याची सर्वांना उत्सुकता होती. संमेलनाच्या आयोजनासाठी कोणत्या संस्था पुढे येतात याबद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळसुद्धा साशंक होते. तरीही संमेलन आयोजनाबाबत नाशिकसह पाच प्रस्ताव महामंडळाकडे आले. साहित्य महामंडळाने नाशिकला कौल दिला आहे. त्यानुसार 94 वे साहित्य संमेलन नाशकात होणार आहे. कविवर्य कुसुमाग्रजांनी स्थापन केलेल्या लोकहितवादी मंडळाला संमेलनाचे यजमानपद सोपवले गेले आहे. साहजिकच नाशकात होऊ घातलेले संमेलन खास असेल. उत्तर महाराष्ट्रासाठी ही आनंद पर्वणीच आहे. संमेलन आयोजनाची संधी नाशिकला तिसर्‍यांदा मिळाल्याबद्दल नाशिककरही नक्कीच आनंदले असतील. येत्या मार्च महिन्यात संमेलन घेण्याचा साहित्य महामंडळाचा इरादा आहे. तरीसुद्धा निमंत्रक संस्थेशी विचार-विनिमय होऊन संमेलन तारखा कदाचित थोड्या फार मागे-पुढे होऊ शकतील. तथापि संमेलन आयोजनाची लगबग मात्र आतापासूनच सुरू झाली आहे. नाशिकला दिव्य पौराणिक आणि भव्य ऐतिहासिक वारसा लाभला आहे. नाशिक जिल्हा यंदा 151 वर्षांचा होत आहे. अशा वेळी साहित्य संमेलनानिमित्त मराठी सारस्वत नाशकात जमणार हाही योगायोगच! ‘करोना’काळात संमेलन घेण्याचे साहस साहित्य महामंडळ आणि लोकहितवादी मंडळाने केले याचेही कौतुक व्हायला हवे. संमेलनाचे शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान स्वीकारणार्‍या आयोजकांना संमेलन आयोजित करताना बरीच कसरत करावी लागेल. ङ्गकरोनाफबाबतची मार्गदर्शक तत्वे व सरकारी नियम तसेच संमेलनाला येणारे साहित्यिक आणि रसिकांची आरोग्य सुरक्षा या सर्व गोष्टींचा विचार करून काटेकोर नियोजन करावे लागेल. संमेलनाला येण्यास देशभरातील मराठी साहित्यप्रेमी उत्सुक असतील. मात्र नेमक्या किती साहित्यिकांना निमंत्रित करायचे? किती रसिकांना उपस्थितीची मुभा द्यायची? याचेही गणित जुळवावे लागेल. प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांशी सल्लामसलत करून उपस्थितांची संख्या निश्चित करावी लागेल. वयोवृद्ध साहित्यिक अथवा ज्येष्ठ नागरिकांना निमंत्रणे द्यायची का? याचाही विचार करावा लागेल. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात आजवर झालेली साहित्य संमेलने बर्‍याच थाटामाटात पार पडली आहेत. साहित्य सारस्वतांनी तेथे मोठ्या संख्येने हजेरीही लावली, पण मराठी माणसांच्या पदरात काय पडले? याचीही चर्चा नेहमीच होते. यंदाच्या संमेलनातून काही नवा आणि तितकाच ठोस विचार मिळावा, अशी अपेक्षा मराठी माणसांना जरूर असेल. संमेलन मर्यादित स्वरुपात झाले तर ते अधिक प्रभावशाली होईल, अशी अपेक्षा करता येईल. साहित्य संमेलन आणि वादांची परंपरा वर्षानुवर्षे चालू आहे. गेल्या वर्षी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली उस्मानाबाद येथे 93 वे साहित्य संमेलन पार पडले. मात्र दिब्रिटो यांच्या निवडीवरून त्यावेळी बराच वाद रंगला होता. अध्यक्षपदाच्या निवडणुकीची परंपरा मोडीत काढून सर्वानुमते अध्यक्ष निवडीची नवी परंपरा सुरू करण्याचे धाडस महामंडळाने दाखवले आहे. नाशिकच्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान कोणाला मिळतो याचीसुद्धा सर्वांना उत्सुकता आहे. पौराणिक काळात रामराज्याची स्थापना होण्याला नाशिकचा पंचवटी परिसर प्रेरणादायी ठरला. आता होऊ घातलेले साहित्य संमेलनसुद्धा मराठी भाषेला नवी झळाळीयुक्त पुनर्जीवन देणारे तसेच मराठी मुलखातील साहित्यिक आणि रसिकांना मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी नवी प्रेरणा देणारे ठरावे, अशी आशा करूया!

- Advertisment -

ताज्या बातम्या