झुलत्या पुलावर टवाळखोरांचा उच्छाद, तरुणींच्या छेडखानीचे प्रकार

jalgaon-digital
2 Min Read

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहरातील पांझरा नदीवरील झुलत्या पूलावर टवाळखोरांनी उच्छाद मांडला असून तरूणींच्या छेडखानीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे टवाळखोरांचा बंदोबस्त करावा.

तसेच तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासह सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन आज याबाबत महापौर चंद्रकांत सोनार यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, पांझरा नदीवर झुलत्या पुलावर महादेव मूर्तीचे पवित्र राखणे आवश्यक आहे. येथे सर्व जातीधर्माचे भाविक येतात. मात्र येथे टवाळखोर मुलांचा त्रास वाढला आहे. ते पान, गुटका खाऊन तेथेच थुंकतात, घाण करतात. तसेच मुलींची छेड काढणे. अश्लील शब्द वापरून तेथील वातावरण बिघडविण्याचे प्रकार घडत आहेत.

हे प्रकार रोखण्यासाठी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे. येथे कोणी धूम्रपान करू नये, असे फलकही लावणे आवश्यक आहे. तसेच येथे सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करून टवाळखोरांचा बंदोबस्त करावा. याबरोबच पुलाखाली उघड्यावर शौचास बसणार्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तरी लवकरात लवकर या मागण्यांची पुर्तता करावी. काही अनर्थ घडला तर महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष जगन ताकटे, शहराध्यक्ष विक्रमसिंह काळे, धुळे तालुकाध्यक्ष रमेश मराठे, बाजीराव खैरनार, कांतीलाल देवरे, मिलिंद पाटील, पवन शिंदे, आशिष देशमुख, सुरेश सुर्यवंशी, सुनील ठाणगे, सतीश गिरामकर, संजय नेतकर, राजेंद्र मराठे, उमेश पवार, साहेबराव पाटील आदी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *