Sunday, May 5, 2024
Homeनगरमानोरीच्या आरोग्य उपकेंद्राची अधिकार्‍यांकडून पाहणी

मानोरीच्या आरोग्य उपकेंद्राची अधिकार्‍यांकडून पाहणी

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यातील मानोरी येथील पडझड झालेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची पंचायत समितीच्या अधिकार्‍यांनी पाहणी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव यांच्याकडून पाठपुरावा केला जात आहे. सदर नादुरुस्त इमारतीच्या दुरूस्तीसाठी अधिकार्‍यांनी पाहणी केली आहे.

- Advertisement -

आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची गेल्या अनेक दिवसांपासून पडझड झाली आहे. सदर इमारत ही गळत असून काही ठिकाणी स्लॅब देखील कोसळला आहे. त्यामुळे ही इमारत वापरण्यायोग्य राहिलेली नाही. पर्यायी या आरोग्य उपकेंद्राचे कामकाज इतर ठिकाणाहून केले जात आहे. या आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे काम व्हावे, अशी वेळोवेळी मागणी येथील नागरिकांनी केली होती.

राहुरी पंचायत समिती उपअभियंता संजय खेले, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अशोक पाटील आदींनी या इमारतीची पाहणी केली आहे. पाच हजार लोकसंख्या असलेल्या या गावात आरोग्य उपकेंद्र इमारतीची नितांत आवश्यकता असल्या कारणाने या इमारतीचे काम व्हावे म्हणून माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून याबाबत लक्ष वेधले होते. दुरूस्ती न करता शासनाने नवीन इमारतीचाच प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

याप्रसंगी आरोग्य सेविका डॉ.स्वाती देसले, आरोग्य सेवक सुनील पोंदे, नवनाथ थोरात, कुसुम आढाव आदींसह आरोग्य विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या