Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकमनमाड : जनता कर्फ्यू ऐच्छिक

मनमाड : जनता कर्फ्यू ऐच्छिक

मनमाड । प्रतिनिधी Manmad

शहरात करोना आटोक्यात आणण्यासाठी व्यापारी बांधवांनी पुकारलेला पाच दिवसांचा जनता कर्फ्यू स्वयंस्फूर्तीने पाळायचा असून पोलीस किंवा नगरपालिका प्रशासनाचा कोणताही हस्तक्षेप राहणार नाही, असा निर्णय पालिका प्रशासन व पोलीस विभाग आयोजित सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. जनता कर्फ्यूत ज्यांना दुकाने सुरू ठेवायची असतील त्यांनी सुरू ठेवावीत, असे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारीक यांनी बैठकीत बोलताना स्पष्ट केले.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून शहरात करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात पाच दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याबाबत चर्चेसाठी आज पालिका सभागृहात पालिका प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग व सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांची संयुक्त बैठक झाली.

या बैठकीत भाजपचे नितीन पांडे, नारायण पवार, शिवसेनेचे संतोष बळीद, राजेंद्र भाबड, गोटू केकाण, काँग्रेसचे भीमराव जेजुरे, सतीश केदारे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारीक यांनी आपली मते मांडली. राज्य सरकार हळूहळू संपूर्ण बाजारपेठ सुरू करत असताना आपण पाच दिवस बाजारपेठ बंद ठेवणे कितपत योग्य आहे? बँक, शासकीय कार्यालये, पेट्रोलपंप, दूध डेअरी, भाजीपाला मार्केट जनता कर्फ्यूमधून वगळण्यात आले होते. त्यामुळे उर्वरित दुकाने बंद ठेवण्यात काय अर्थ आहे? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.

जनता कर्फ्यू व्यापारी महासंघाने पुकारलेला असून त्यास शासनाची मान्यता नसल्यामुळे पोलीस व पालिका प्रशासन कुठलाही हस्तक्षेप करणार नाही, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. शासनाने बाजारपेठेसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेची वेळ ठरवून दिली आहे. शिवाय सम-विषम प्रणालीदेखील लागू आहे. त्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जाईल, असेही पोलीस व पालिका प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.

त्यामुळे पाच दिवस जनता कर्फ्यू स्वेच्छेने पाळण्यात यावा. दुकाने उघडा किंवा बंद ठेवा. कुणावर कोणतेही बंधन नाही, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. बैठकीस डॉ. जी. एस. नरवणे, रिपाइंचे अनिल निरभवणे, पोलीस उपनिरीक्षक वैभव महानगरे, पालिकेचे प्रशासन अधिकारी राजेंद्र पाटील, राजेंद्र वैजापूरकर, अजहर शेख, अनिल गुंदेचा, फिरोज शेख, पप्पू दराडे, अकबर शहा आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या