Wednesday, April 24, 2024
Homeनगरदुचाकीवरून जाणार्‍या युवकांचा मांजा दोर्‍यामुळे ओठ कापला, मोठी दुखापत

दुचाकीवरून जाणार्‍या युवकांचा मांजा दोर्‍यामुळे ओठ कापला, मोठी दुखापत

राहाता |वार्ताहर| Rahata

मुलांना शाळेत सोडविण्यासाठी दुचाकीवरून जाणार्‍या युवकाच्या गळ्याला चेहर्‍याला व ओठाला पतंग उडवणार्‍या नायलॉन मांजामुळे मोठी दुखापत होऊन ओठाला 4 टाके पडल्याची घटना मंगळवारी राहाता येथे घडली. सुदैवाने शाळकरी मुलांना कुठलीही दुखापत झाली नाही.

- Advertisement -

पतंग उडवण्याकरिता वापरण्यात येणार्‍या मांजा दोर्‍याला बंदी असतानाही राहाता परिसरात मोठ्या प्रमाणात मांजाचा सर्रास वापर होत असल्याने पोलिसांच्या व नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे अनेकांना या दोर्‍यापासून जीव घेण्या प्रकाराला सामोरे जावे लागत आहे. मंगळवारी राहाता शहरातील अनिल बोठे सकाळी मुलांना शाळेत सोडण्याकरिता जात असताना खंडोबा चौक जवळील धान्य गोडाऊन जवळ दुचाकीवरून जात असताना पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणार्‍या मांजा दोर्‍याने त्यांच्या ओठावर, मानेवर तसेच गालावर मोठ्या प्रमाणात दुखापत झाली. त्यामुळे त्यांच्या ओठाला चार टाके पडले.

सुदैवाने दुचाकीवर बसलेल्या मुलांना कोणत्याही प्रकारे दुखापत झाली नाही. ही घटना घडल्यानंतर त्यांना तात्काळ डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे यांच्याकडे उपचारासाठी नेण्यात आले. राज्यात पतंग उडवण्याकरिता वापरण्यात येणारा मांजा दोर वापरण्यास बंदी असतानाही राहाता परिसरात पोलिसांच्या व नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे शहरातून दुचाकी, सायकल व पायी जाणार्‍या नागरिकांना या दोर्‍यामुळे मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.

तसेच या दोर्‍यामुळे निसर्गातील पशु पक्षांना मोठ्या प्रमाणात इजा होते. राहता शहरात अनेक दुकानदार सर्रासपणे मांजा विक्री करतात. याकडे पोलीस व नगरपरिषद कानाडोळा करते. पोलीस व नगरपरिषदेने तात्काळ मांजा विक्री करणार्‍या व्यवसायिकांवर कडक कारवाई करून त्यांच्याकडून दंड आकारणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

राहाता शहरात पतंग उडवण्याकरिता वापरण्यात येणार्‍या मांजावर बंदी असतानाही पोलीस व नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील अनेक दुकानांत या मांजा दोर्‍याची सर्रास विक्री होते. त्यामुळे अनेक नागरिकांना तसेच पशु पक्ष्यांना या दोर्‍यामुळे इजा होते. पोलीस प्रशासन व नगरपरिषदेने या मांजा दोरा विक्री करणार्‍यांवर कडक कारवाई करावी.

– अनिल बोठे, जखमी नागरिक

- Advertisment -

ताज्या बातम्या