Wednesday, April 24, 2024
Homeनगरनेवासा खुर्दचे मंडलाधिकारी लवांडे व प्रवरासंगमचे तलाठी म्हसे निलंबित

नेवासा खुर्दचे मंडलाधिकारी लवांडे व प्रवरासंगमचे तलाठी म्हसे निलंबित

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात पीक पाहणी दौर्‍यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पकडलेल्या वाळू उपसा करणार्‍या दोन बोटी प्रकरणी वाळूतस्करीला जबाबदार धरत नेवासा खुर्दचे मंडलाधिकारी सुनील भाऊसाहेब लवांडे तसेच प्रवरासंगमचे तलाठी भारत दत्तात्रय म्हसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी मंडलाधिकारी सुनील लवांडे यांना तर उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी तलाठी भारत म्हसे यांना निलंबित केले.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना म्हाळापूर-मंगळापूर परिसरात वाळू उपसा करणार्‍या दोन लोखंडी बोटी निदर्शनास आल्याने त्यांनी ताफा थांबवून जिल्हाधिकार्‍यांसमोरच स्थानिक अधिकार्‍यांना धारेवर धरून बोटी जप्त करून गुन्हे दाखल करण्याचे तसेच तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचे आदेश दिले होते. ज्याची वस्ती आहे त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल करावा, आशा सूचना पोलीस निरीक्षकांना दिल्या होत्या.

दि. 24 रोजी नेवासा खुर्दचे मंडलाधिकारी सुनील भाऊसाहेब लवांडे यांच्या फिर्यादीवरून नेवाशातील चौघांवर गुन्हा दाखल झाला. प्रांत, तहसीलदार, मंडलाधिकारी व तलाठी यांचेवर काय कारवाई होते याकडे तालुक्याचे लक्ष लागून होते.

मंडलाधिकारी सुनील भाऊसाहेब लवांडे यांना बजावण्यात आलेल्या निलंबन आदेशात म्हटले की, तहसीलदार यांचे संदर्भ क्र.1 च्या अहवालामध्ये म्हाळापूर, ता. नेवासा या गावात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याचे स्पष्ट होते. अवैध वाळू उत्खननास प्रतिबंधात्मक कारवाई करणेबाबत संबंधित मंडळ अधिकारी एस. बी. लवांडे यांनी उचित कार्यवाही केलेली नसल्याचे दिसून येते.

यावरून मंडलाधिकारी यांनी पदीय जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडलेली नाही, स्थायी आदेश व कायद्यातील विहीत कार्यपध्दतीचे पालन केलेले नाही. कायद्याविरुध्द कृत्य केलेले असून कर्तव्यात कसूर केलेला आहे. त्यामुळे शिस्तभंगविषयक कारवाई करणे क्रमप्राप्त झाले आहे. शिस्तभंगविषयक प्राधिकरण या नात्याने प्राप्त झालेल्या अधिकारान्वये एस.बी.लवांडे यांना शासन सेवेतून निलंबित करीत आहे.

प्रवरासंगमचे तलाठी भारत दत्तात्रय म्हसे यांना उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी बजावलेल्या आदेशात म्हटले की, प्रवरासंगमचे तलाठी भारत दत्तात्रय म्हसे यांनी पदीय जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली नाही. त्यामुळे शिस्तभंगविषयक कारवाई करणे क्रमप्राप्त आहे. शिस्तभंग विषयक प्राधिकरण या नात्याने प्राप्त झालेल्या अधिकारान्वये भारत दत्तात्रय म्हसे यांना शासन सेवेतून निलंबित करीत आहे.

नेवासा खुर्दचे मंडलाधिकारी सुनील भाऊसाहेब लवांडे व प्रवरा संगमचे तलाठी भारत दत्तात्रय म्हसे यांना निलंबित केल्याच्या माहितीला तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनीही दुजोरा दिला आहे. दोघांचेही निलंबन 2 नोव्हेंबरपासून मानले जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या