Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून भाच्याने रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव

मामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून भाच्याने रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव

पुणे (प्रतिनिधी) – मामा गावाला जाऊ देणार नाही म्हणून 21 वर्षीय भाच्याने त्याच्या 17 वर्षीय मामे भावासोबत मिळून स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला. भाच्याचे अपहरण झाले आहे, असे मामाला सांगितले. मामाने घटनेची शहानिशा न करता थेट पोलिसांना कळवले. पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून भाच्याला अजंठानगर, चिंचवड येथून ताब्यात घेतले आणि या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला. पोलिसांनी तिघांच्या विरोधात पोलिसांची दिशाभूल केल्याचा गुन्हा दाखल केला.

विद्यानगर, चिंचवड येथून एका अल्पवयीन मुलासोबत चाललेल्या तरुणाचे अपहरण झाल्याचा फोन अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी पोलीस नियंत्रण कक्षास केला. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासाला सुरवात केली असता घटना स्थळावरून एक सफेद रंगाची स्कॉर्पिओ गेल्याचे दिसून आले. मात्र त्यात अल्पवयीन मुलाने सांगितल्याप्रमाणे पाच-सहा आरोपी नव्हते. तसेच त्या मुलाने गाडीचा पाठलाग केल्याचेही सांगितले. मात्र त्यात असा कोणातही प्रकार आढळून न आल्याने पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

- Advertisement -

तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे पोलिसांनी चौकशी केली असता अपहरण झालेली व्यक्‍ती अंजठानगर, चिंचवड येथे असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी त्याला तेथे जाऊन ताब्यात घेतले. मामाच्या गावी जाण्यासाठी घरातील व्यक्‍ती विरोध करतील म्हणून अपहरण झालेला तरुण आणि अल्पवयीन मुलाने अपहरणाचा बनाव केल्याचे तपासात समोर आले. कोणतीही शहानिशा न करता पोलिसांना खोटी माहिती दिली व अपहरणाचा बनाव रचल्याने निगडी पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या