Thursday, April 25, 2024
Homeनगरपूर्वा नक्षत्राच्या पावसाने खरिपाची पिके बहरली

पूर्वा नक्षत्राच्या पावसाने खरिपाची पिके बहरली

माळवाडगाव (वार्ताहर)

मघा नक्षत्रात उघडीप दिल्यानंतर खरिपातील सोयाबीन, कपाशी, मका पीके सुकुन चाललेली असताना गणरायाच्या आगमनाबरोबर पुर्वा नक्षत्राच्या पावसाचे आगमन होणार या हवामान तज्ञ पंजाबरांव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार पावसाने हजेरी लावली. 1 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या पावसाने श्रीरामपूर तालुक्यासह पुर्व गोदाकाठ परिसरात सोयाबीन, कपाशी पिके बहरल्याने शेतकर्‍यात समाधानाचे वातावरण आहे.

- Advertisement -

या वर्षीच्या पावसाळ्यात 8 जूनला प्रारंभ झालेल्या मृग नक्षत्रासह 22 जूनला लागलेल्या आद्रा नक्षत्राचा पहिला आठवडाही कोरडाच गेला. मात्र दुसर्‍या चरणात आद्राने खरिप पेरणीलायक हजेरी लावल्याने श्रीरामपूर पुर्व गोदाकाठ परिसरातील मुठेवाडगाव, माळवाडगाव, कमालपूर, घुमनदेव, भामाठाण, महांकळवाडगाव, खानापूरसह गोदाकाठ पलिकडील वैजापूर तालुक्यातील गावांनीही खरिपातील सोयाबीन, मका पेरणी, कपाशी लागवडीची लगबग सुरू करून समाधानकारक पेरणीयोग्य ओल नसतानाही पेरणीची हिंमत केली.

पेरणीनंतर 6 जुलैस सुरू झालेल्या पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने खरिपातील पेरणीस खर्‍या अर्थाने जिवदान देत शेतकर्‍यांची दुबार पेरणीची चिंता मिटविली. 20 जुलैच्या पुष्य व 3 ऑगस्टला सुरू झालेल्या आश्‍लेषा नक्षात्रातील संततधार झीमझिम पावसाने खरिपातील पिकांना ड्रीप पध्दतीने पोषक वातावरण तयार होऊन पिके बहरली.

मात्र 17 ऑगष्टला लागलेले मघा नक्षत्र संपुर्ण कोरडे गेल्याने खरिपातील बहरलेली पीके ऊन धरून सुकु लागली होती. पाण्याची व्यवस्था असलेल्या शेतकर्‍यांनी वीज पंप सुरू केले. तर भोकर सबस्टेशन अंतर्गत गावांत कमी दाबाअभावी रोहीत्र बंद ठेवण्यात येऊन वीजेचा खेळखंडोबा सुरू झाला. शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत असताना 30 ऑगस्टला सुरूवात झालेल्या पूर्वा नक्षत्राचा पाऊस 1 सप्टेबर पासून गणपतीत अडकणार याची खात्री होती. कारण त्यास आधार होता तो हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या सोशल मिडियावरील संदेशाचा.

बुधवार दि.1 सपटेबर रोजी गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू असताना काही भागात सायंकाळी तर श्रीरामपुरच्या पुर्व गोदाकाठ परिसरात रात्री 10 च्या सुमारास हजेरी लावलेल्या वरूणराजाने रात्री 12 ते 1 च्या दरम्यान सर्वदूर जोरदार मुसंडी मारत गावोगावच्या शेतशिवारात पाणीच पाणी करून टाकले. अन् सोशल मिडीयावर अचूक अंदाज सांगणार्‍या पंजाबराव डंख यांच्या कौतुकाचा पाऊस पडला.

- Advertisment -

ताज्या बातम्या