माळवाडगाव शेतकरी फसवणूक ; दोघा आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी

jalgaon-digital
2 Min Read

माळवाडगाव (वार्ताहर) –

श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगावसह परिसरातील शेतकर्‍यांचे कोट्यावधी रुपये लुट प्रकरणातील

रमेश रामलाल मुथ्था, चंदन रमेश मुथ्था, गणेश रामलाल मुथ्था या तिघा आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने रमेश व चंदन या दोघांना 19 एप्रिल पर्यत पुन्हा पोलीस कोठडी तर गणेश मुथ्था यांस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

माळवाडगाव येथे भुसार व किराणा मालाचे व्यापारी मुध्था बंधूंनी शेतकर्‍यांचे कोट्यावधी रूपये बुडवून पोबारा केल्यानंतर श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्या आठवड्यातच मुन्ना ऊर्फ गणेश रामलाल मुथ्था यांस पत्नीसह गणपूर ता. चोपडा येथून अटक करून आणले होते. त्यापाठोपाठ बलसाने ता. साक्री येथून चांदनी चंदन मुथ्था हिस तर तीसर्‍या दिवशी उर्वरित मुख्य आरोपी रमेश व चंदन या बाप बेट्याच्या जालन्यातून मुसक्या आवळल्या होत्या. श्रीरामपूर येथे आणल्यानंतर न्यायालयाने 15 एप्रिलपर्यंत तीघांना पोलिस कोठडी सुनावली होती. काल पोलीस कोठडीची मुदत संपणार होती. श्रीरामपूर न्यायालय आज सुट्टीवर असल्याने प्रभारी चार्ज नेवासा न्यायालयाकडे असल्याने श्रीरामपूरहून आरोपींना नेवासा न्यायालयात पोलीस बंदोबस्तात नेण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती ए. बी. निवारे यांच्यासमोर आरोपींना हजर करण्यात आले. न्यायालयासमोर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे युक्तिवाद करताना म्हणाले की, शेतकर्‍यांचे कोट्यावधी रूपये लुट प्रकरणाचे स्वरुप मोठे आहे. अद्याप आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत करावयाचा असून या आरोपींना 20 एप्रिलपर्यत पोलीस कोठडी देण्याची मागणी केली.

न्यायाधीश श्रीमती निवारे यांनी मुख्य आरोपी रमेश रामलाल व चंदन रमेश मुथ्था यांना 19 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी तर गणेश मुथ्था याला न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयात हे. कॉ. सतीश गोरे, पो कॉ. सोमनाथ मुंडले, फिर्यादी शेतकर्‍यांचेवतीने वकील अँड तुषार आदीक, आरोपीचे वकील अँड. शेलोद (नगर) अँड. मयुर गांधी, अँड. म्हस्के यावेळी उपस्थित होते. या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे शेतकर्‍यांचे प्रतिनिधी नेवासा न्यायालय आवारात आवर्जून हजर होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *