Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedमेकअप इंडियाच्या चमकोगिरीतून काय साध्य होणार…?

मेकअप इंडियाच्या चमकोगिरीतून काय साध्य होणार…?

पुरुषोत्तम गड्डम
– भ्रमणध्वनी – 9545465455

जिन्हे अपने बारे में पता नही,
वो औरो को जानने का दावा करते है!
वो लोग उतने अच्छे है नही,
जितना होने का दावा करते है !

- Advertisement -

ता ही शायरी कुणासाठी आठवली ते विचारु नका! पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौर्‍यावर येणार आहेत म्हणून ते ज्या अहमदाबाद शहरात दाखल होणार त्या शहरात आणि खास करुन ट्रम्प ज्या-ज्या भागातून जाणार त्या-त्या भागात कमालीची विकासकामे (?) सुरु आहेत. अहमदाबाद विमान तळ ते सर्कीट हाऊस दरम्यान साडेचार किमी अंतराच्या रस्त्याच्या दुतर्फा झोपडपट्टी आहे. त्या झोपडपट्टीचे ओंगळवाणे दर्शन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला घडू नये म्हणून या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाच कि.मी. अंतराची भिंत बांधण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर या परिसरातील सर्व भटक्या कुत्र्यांना आणि या ठिकाणी आढळणार्‍या निलगायींना पकडण्याचे सत्र सुरु केले आहे.

या भटक्या कुत्र्यांवर संक्रांत आणण्याचे कारण म्हणजे 2015मध्ये अमेरिकेचे मंत्री जॉन कॅरी हे ‘वहायब्रंट गुजरात’ या कार्यक्रमासाठी आले होते. तेथून विमानतळाच्या दिशेने जात असतांना त्यांच्या गाडीसमोर एक कुत्रा आला होता. आता डोनाल्ड ट्रम्पच्या ताफ्यातील गाड्यांसमोर कुत्रा येऊ नये म्हणून अहमदाबादमध्ये वेगळ्याच प्रकारची संचारबंदी सुरु झाली आहे. अहो एवढेच नाही तर.. ट्रम्प ज्या-ज्या परिसरातून वावरणार आहे, त्या-त्या परिसरातील पानटपर्‍या दौरा संपेपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारण अहमदाबाद शहरात पान खाणार्‍यांची संख्या मोठी आहे. परिणामी या शहरातील रस्त्यांवर पान खाऊन पिचकार्‍या मारणार्‍यांची संख्या जास्त आहे. म्हणून अहमदाबादच्या एअरपोर्ट सर्कल ते सर्किट हाऊस दरम्यान पानांच्या दुकानांना ‘सील’ करण्यात आले आहे. म्हणजे आता 24 फेब्रुवारीपर्यंत या पान दुकानदारांना सक्तीची रजा !

झोपडपट्टी किंवा स्लम एरिया भिंत बांधून झाकण्याचे कारण तरी काय…? असा प्रश्न गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी विचारला असता त्यांनी दिलेले उत्तर असे होते… ‘काही दिवसांपूर्वी जापानचे प्रधानमंत्री शिंजो आबे हे भारत दौर्‍यावर येणार होते. त्यावेळी स्लम एरिया दृष्टीस पडू नये म्हणून रस्त्याच्या दुतर्फा हिरव्या जाळीच्या कापडांचे पडदे लावले होते. मात्र दौर्‍याच्या दोन दिवस हे पडदे उडून गेले होते. यावेळी तारांबळ नको म्हणून अशा पक्क्या भिंती उभारण्यात आल्या आहेत व त्यावर छान विकासकामांच्या जाहिराती इंग्रजीतून लिहिण्यात येणार आहेत !’

म्हणजे एकट्या डोनाल्ड ट्रम्पला पटविण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झोपडपट्टीवासियांना रस्त्यावर येण्यासाठी बंदी! आपल्या देशात कुणी बडा परदेशी पाहुणा येणार असेल तर त्याची बडजास्त ठेवण्यासाठी सरबराई करणं निश्चितच योग्य आहे. पण या सरबराईतून केवळ मलमपट्टी होणार असेल तर उपयोग काय? मेक-इन-इंडियाचे असे मेक-अप करुन चालणार नाही! दुर्दैवाने गेल्या 8-10 वर्षांपासून देशात प्रत्येक गोष्टीचा ‘इव्हेन्ट’ केला जातोय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी संत गाडगेबाबा,
म. गांधी या महापुरुषांच्या नावाने सुरु केलेल्या ग्रामस्वच्छता अभियानाचा आता अनेक गावांना विसर पडला आहे. शौचालये बांधले पण वापरावर प्रश्नचिन्ह आहे. आज संपूर्ण भारतातील रस्त्यांमध्ये ‘स्वच्छ भारत अभियाना’चे काय झाले आहे, हे सर्वश्रूत आहे. कोणतेही शहर म्हटले की, तेथील रहिवाशांच्या किमान अपेक्षा काय असू शकतात? तर सुव्यवस्थित रस्ते, स्वच्छता आणि पिण्याचे शुध्द पाणी. मात्र प्रत्येक शहरात आणि खेड्यांमध्ये आजही कमी-अधिक प्रमाणात वरील समस्या तळ ठोकून आहेत. सुरुवातीला जेव्हा स्वच्छ भारत अभियान सुरु झाले. त्यावेळी तर दिल्लीच्या एका रस्त्यावर राजकारण्यांच्या चमच्यांनी आधी कचरा आणून टाकला आणि नंतर त्याच कचर्‍याला स्वच्छ करण्यासाठी राजकारणी सामोरे आले. छायाचित्रण झाले. आणि पुन्हा जैेस थे… अधिक तपास केला तर त्यातून आणखी अफलातून माहिती बाहेर आली. ती अशी, राजकारण्यांच्या चमकोगिरीसाठी जो कचरा रस्त्यावर आणून फेकण्यात आला होता. तो कचरा केवळ साधारण कचरा नव्हता तर, तो ‘हायजेनिक गारबेज’ म्हणजे विषाणुमुक्त कचरा होता. म्हणजे त्या कचर्‍यामध्ये वावरल्यानंतर सुध्दा राजकारण्यांना कोणत्याही आजाराची बाधा होणार नाही. असा तो कचरा होता. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये अशा पध्दतीने चमकोगिरी होत असल्यामुळे मुळ मुद्यांना बगल देऊन भलतीकडेच सारा फाफटपसारा सुरु झाला आहे.

कमालीची असंवेदनशीलता बडा परदेशी पाहुणा देशात येत असतांना त्याच्या सरबराईसाठी तत्परता दाखविणारे देशाचे कारभारी सामान्य नागरिकांबाबत संवेदनशील नसतात. देशावर कर्जाचा डोंगर असतांना आमदार-खासदारांची पगारवाढ करतांना कोणालाही विरोध करावासा वाटत नाही. तुम्ही एकदा का आमदारकीची शपथ घेतली की, तुम्हाला पेन्शन योजना लागू होते. एक टर्म आमदार राहिलात तर तुम्ही पेन्शनला पात्र असतात. शिवाय एकापेक्षा जास्त टर्म आमदारकी भूषविली, तर प्रत्येक टर्मला 10 हजार पेन्शन मिळते. आजमितीस राज्यात 800 माजी आमदार आहेत. आणि 366 विद्यमान आमदार आहेत. यातले काही जण खासदारही झालेत. त्यांना दोन्हीकडचे पेन्शन मिळते. याउलट वयाची 30 ते 35 वर्षे नोकरी करुनही सामान्य नोकरदाराला समाधानकारक वेतन मिळत नाही व निवृत्तीनंतरचे आयुष्य हलाखीत काढावे लागते. यात सर्वात विशेष गोष्ट म्हणजे राज्यातील 253 आमदार करोडपती आहेत. 10 कोटींपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या आमदारांची संख्या 90च्यावर आहे. तरीही या लोकप्रतिनिधींना पगारवाढीची लालसा सुटली नाही. याउलट भारतीयांना सतत नवनव्या वादग्रस्त विधेयकांमध्ये आणि मंत्र्यांच्या उथळ जुमलेबाजीमध्ये अडकवून ठेवण्याचे कसब सध्याच्या सरकारमध्ये ठासून भरले आहे. त्यामुळे भारतातील नागरिक त्यातल्या त्यात नेटीझन्स बांधव आणि सामान्य माणूस त्याच्या दैनंदिन जीवनातले प्रश्न सोडून नाही-नाही त्या विषयावर चर्चा करण्यात धन्यता मानत आहेत. भारताचे दिवंगत माजी प्रधान मंत्री लालबहादूर शास्त्री यांच्यातील तळमळ आणि साधेपणा आताच्या राजकारण्यांनी अंगिकारला, तर देश निश्चितच स्थिरस्थावर वातावरणात रमेल! इयत्ता दहावीच्या हिंदी विषय पुस्तकात ‘मेरे बाबुजी’ हा पाठ आहे. त्यातला किस्सा निश्चितच प्रेरणादायी आहे. शास्त्रीजी प्रधानमंत्री असतांना त्यांनी स्वतःसाठी महागडी सरकारी गाडी वापरण्यास नकार दिला होता. ते आपल्या नेहमीच्या गाडीनेच प्रवास करीत होते. एकदा शास्त्रीजी घरात नाहीत. असे पाहून त्यांचे चिरंजीव सुनील व अनिल यांनी प्रधानमंत्रीसाठी असलेली ती कार मित्राच्या वाढदिवसाला घेऊन गेले. ही बाब जेव्हा शास्त्रीजींना कळाली, त्यावेळी त्यांनी स्वतःच्या पगारातून किलो मीटरप्रमाणे पैसे व दंड भरला आणि मुलांनाही समज दिली. एवढी विनयशीलता आजकालच्या राजकारण्यांमध्ये नसली तरी काही प्रमाणात स्वार्थपरायण प्रवृत्ती त्यांनी सोडली पाहिजे. ही जनता जनार्दनाची अपेक्षा आहे. अन्यथा ज्या वेगाने निवडून आलेले लोकप्रतिनिधी श्रीमंत होतात ते पाहिले असता खालील शायरीप्रमाणे सामान्यजनांची अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही…

फलसफा समझो
न असरारे सिसायत समझो,
जिंदगी सिर्फ हकीकत है,
हकीकत समझो,
जाने किस दिन हो जाये,
हवायें भी निलाम यहाँ.,
आज तो साँस भी लेते हो,
तो गनिमत समझो।

- Advertisment -

ताज्या बातम्या