Thursday, April 25, 2024
Homeनगर‘ओए कापे’साठी तरुणाई सज्ज

‘ओए कापे’साठी तरुणाई सज्ज

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

संक्रात म्हटले की डोळ्यासमोर येते पतंगबाजी. यासाठी लागणारे पतंग आणि मांजाची बाजारपेठ चांगलीच फुलून गेली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा पतंग आणि मांजाचे दर 10 ते 20 टक्क्यांनी वाढल्याचे चित्र आहे. उद्या सकाळपासूनच आकाशात पतंगांची काटाकाटी पाहायला मिळेल. बंदी असलेला नायलॉन मांजाही चोरी छुपके विकला गेल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

नगरचे पतंग राज्यात प्रसिद्ध आहेत. या दिवशी नगरचे आसमंत पतंगांनी बहरून जाते. घराच्या गच्चीवरून, मोठ्या इमारतींवरून, तसेच काहीजण मैदानातून पतंग उडवितात. नगर शहरातील बागडपट्टी, सर्जेपूरा रोड, झेंडीगेट माळीवाडा, भिंगार, सदरबाजार, केडगाव, कायनेटिक चौक, पाईपलाईन रोड, सावेडीगाव, प्रोफेसर कॉलनी चौक, नागापूरसह शहरातील विविध ठिकाणी पतंग व मांजांची दुकाने थाटली आहेत.

बागपट्टीतील रस्ते विविध आकर्षक पतंगानी सजविण्यात आले आहे. पतंग तयार करणार्‍या झेंडीगेट येथील दुकानांत देखील मोठी गर्दी पाहवयास मिळाली. महागाईमुळे पतंग व मांजांचे दर वाढले आहेत. बरेली, सुरती, पांडा, कॉटन या मांजाचे दर 150 पासून 400 रुपये प्रति रीळ (1000 मीटर) आहेत. दुसर्‍या व्यक्तीचा पतंग कापण्यात एक वेगळीच मजा असते. हा आनंद लहानांपासून वृद्धांपर्यंत अनेकजण घेत असतात. अनेकजण पतंगबाजीसाठी सुट्टी घेतात. विविध व्यावसायिकही आपली दुकाने बंद ठेवून पतंग उडविण्याचा आनंद घेतात. अनेक इमारतींवर गाण्यांच्या तालावर तरुणाई बेधूंद नाचत असते.

छोटा भीम, अँग्रीबर्ड, राजाबाबू

गोंडा, सांबा, डोरेमॉल, छोटा भीम, चुटकी, मिकीमाऊस, बाहुबली, सुरती, बॉम्बे टाईप, फर्र्‍या, भवरा, तिरंगा, छत्री, स्पायडर मॅन, चट्टल आदी विविध रंगाचे कागदी पतंग 5 रूपयांपासून ते 600 रूपयांपर्यंत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कार्टूनचे पतंग लहान मुलांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत.

5 फुटांचा बॉट्टल !

लहान व मध्यम आकाराच्या पतंगांना चांगली मागणी आहे. मात्र, काही हौशी पतंगबाजांतचा कल मोठ्या पतंग उडवण्याकडे असतो. सुमारे 5 फूट उंचीचा पतंगही बाजारात उपलब्ध आहे. अर्थात विक्रीसाठी या पतंगांची संख्या कमी असली तरी या पतंगांचा चांगला खप आहे, असे भारत पतंगचे संचालक बापू बर्‍हाटे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या