Friday, April 26, 2024

माई…

माझी आई अचानक अनंताच्या प्रवासाला निघून गेली याचे दुःख शब्दांतून व्यक्त होणे अशक्य. माईविषयी काय बोलावे आणि किती बोलावे हेच कळत नाही. तिने तिच्या संघर्षातून, जिद्दीतून आणि स्वतःच्या वर्तणुकीतून अनेक आदर्श घालून दिले आहेत. ते माझ्यासाठी मोलाचे तर आहेतच, पण माणूस म्हणून प्रत्येकासाठीच ते अनुकरणीय आहेत. आपल्या आईचे ऋण कधीच कोणी फेडू शकत नाही आणि मलाही त्या ऋणातच सदैव राहायचेय.

ममता सिंधूताई सपकाळ

माझ्यासाठी वडील, भाऊ, बहीण असे सर्व काही आईच होते. खरे तर परिस्थितीमुळे मला आईचा सहवास खूप कमी लाभला. असे असले तरी माझ्या जडणघडणीच्या काळातील अनंत आठवणी मला नेहमी स्मरतात. आईविषयी एक प्रसंग मला आठवतो. मी दुसरीत असेन. वय सहा-सात वर्षे. सहज म्हणून एका मैत्रिणीच्या घरी गेले होते. तिथे तिच्या घरच्यांनी माझी विचारपूस केली. त्यावेळी मैत्रीण म्हणाली, तिला वडील नाहीत. मग त्यावर त्यांची सहानुभूती ऐकायला मिळाली. मुळात आईने मला माझ्या वडिलांविषयी काहीही सांगितलेले नव्हते. त्यांच्याविषयी कुठलीही चर्चा आम्ही मायलेकींनी कधी केलेली नव्हती. त्यामुळे वडील या संकल्पनेची माझी पाटी कोरीच होती. तिथून घरी आले आणि आईला विचारले, मला नेहमी वडिलांंविषयी प्रश्न विचारला जातो, मी काय उत्तर द्यायचे? तेव्हा मी आईला पहिल्यांदा रडताना पाहिले. जे यापूर्वी मी कधीच पाहिले नव्हते. आपण काहीतरी चुकीचा प्रश्न विचारल्यामुळे आईला रडू आले याचे मात्र फार वाईट वाटले. पण मग ती म्हणाली, कोणी विचारले तर बाबा नाहीत असे सांगू नको. ते आहेत असे सांग. पण मला तेव्हाही ते कुठे असतात, काय करतात हे विचारावेसे वाटले नाही. कारण तिचे रडणेच मला सहन झाले नाही. त्यामुळे तो प्रश्न तेव्हा अनुत्तरीतच राहिला.

- Advertisement -

यानंतरचा आणखी एक प्रसंग मला आठवतो, तो मी सातवीत असतानाचा. तेव्हा मी सेवासदन शाळेत शिकत होते आणि वसतिगृहात राहायला होते. मला आठवतेय, आई मला भेटायला आली की सोमवार पेठेतल्या संत गाडगेबाबा धर्मशाळेत उतरायची. एकदा सुट्टीचा वार असल्याने मला तिच्यासोबत राहायला मिळाले. त्यावेळी नेमके आई तिचे आत्मचरित्र लिहित होती. तिची सवय अशी होती की लिहिलेली पाने उशीखाली ठेवायची. त्यावेळी ती काय लिहित असते हे मला माहीत नव्हते. पण उत्सुकता मात्र होती. ती गाढ झोपलेली असताना मी ते कागद घेऊन वाचायला सुरुवात केली. हळूहळू माझ्या लक्षात आले की, लिखाणातल्या व्यक्तिरेखा म्हणजे दुसर्‍या-तिसर्‍या कोणी नसून आम्ही मायलेकीच आहोत. त्यातली दोन प्रकरणे मी वाचून काढली. माझा जन्म, आईचे घराबाहेर पडणे, तिला भेटलेली सरस्वतीची आई हे सर्व वाचल्यानंतर मला रडू कोसळले. माझ्या रडण्याने आई जागी झाली. तिने हळूवारपणे माझ्या हातातून ते कागद काढून घेतले. खरे तर ती ते ओढून घेईल, रागावेल असे वाटले होते; परंतु मला काय समजलेय म्हणून मी रडतेय हे तिला लक्षात आले होते. त्यामुळे तिने मला हळूवार जवळ घेतले आणि एवढेच म्हणाली की, ममता हे घडून गेलेय आणि घडून गेलेल्या गोष्टी पाठीमागे टाकायच्या असतात बाळा… त्या उगाळायच्या नसतात. त्यासाठी पुन्हा-पुन्हा अश्रू वाया घालवायचे नसतात. पुढे आयुष्यभर मी ही गोष्ट कायम लक्षात ठेवली की घडून गेलेले मागे टाका, उगाळत बसू नका.

माईच्या आसपास राहून ती कोणत्या वेळी काय निर्णय घेते, नेमकी प्रतिक्रिया कशी देते हे मी निरीक्षणातून शिकत गेले. त्यातूनच माझीही जडणघडण झाली. नकळतपणाने मीही आयुष्यात एखादा निर्णय घेताना, प्रसंग हाताळताना इथे आई असती तर कशा प्रकारे वागली असती असा प्रश्न स्वतःच स्वतःला विचारते आणि निर्णय घेतेे. निरीक्षणांमधून आईच्या व्यक्तिमत्त्वाची खोली आणि उंची अधिकाधिक उलगडत गेली.

पुण्यामध्ये माझा पदवीपर्यंतचा शिक्षणाचा आणि राहण्याचा सर्व खर्च दगडूशेठ हलवाई ट्रस्टने केला. मला सेवासदनला प्रवेश मिळवून दिला. अजून आठवतेय, जूनमध्ये शाळा सुरू होण्याआधी एक दिवस आम्ही गावावरून यायचो. आई मला आप्पा बळवंत चौकात घेऊन जायची. नवे कोरे दप्तर, पुस्तके, वह्या, कंपास आणि वसतिगृहात लागणारे जे काही सामान असेल ते मला घेऊन जायचे असायचे. खरेदी झाल्यानंतर वसतिगृहात खोलीपर्यंत सोडवण्यासाठी आई कधीच आली नाही. ती गेटमधूनच निरोप घ्यायची. मध्यंतरी माझ्या मुलीला-सानूला आप्पा बळवंत चौकातून जाताना मी या आठवणी सांगत होते. त्यावेळी मी तिला म्हणाले की, मी असेच सोडून गेले आणि पुढे काही दिवस दिसलेच नाही तुला तर….? लेक कसनुशी झाली. अगदी अशाच भावना माई मला सोडून जाताना व्हायच्या.

माई शिक्षणाबाबत पहिल्यापासूनच खूप आग्रही होती. तिला स्वतःला शिकण्याची खूप इच्छा होती, पण ते शक्य झाले नाही. त्यामुळे केवळ मीच नव्हे तर संस्थेतील प्रत्येकाने मग ते मुलगा असो की मुलगी शिकले पाहिजे असा तिचा आग्रह असायचा. होस्टेलवर असताना तिचे माझ्यावर बारकाईने लक्ष असायचे. वसतिगृहात रेक्टर मॅडमला सांगून जायची की, ममता हूड आहे. काही तुम्हाला वावगे वाटले तर दोन धपाटे घाला, पण तिच्यावर लक्ष ठेवा. त्यामुळे माझ्यावर झालेल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संस्कारांमध्ये आईचे फार मोठे योगदान आहे.

शिक्षणाबरोबरच संस्कारांबाबतही ती खूप आग्रही होती. मोठ्या माणसांशी बोलताना अदबीने बोलले पाहिजे, त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे, हे नेहमी सांगत असे. याबाबतचा एक प्रसंग आठवतोय. फैजपूरला (जि. जळगाव) असताना तिथे आमचे एक बाबाजी होते. ते आईला मुलगी मानायचे. आई आली की ते नेहमी तिच्यासाठी भाकरी घेऊन यायचे. असेच एकदा खेळता खेळता मी बाहेरून आले आणि त्यांच्या डोक्यावरची टोपी उडवली. आजोबांना त्याचे काही वाटले नाही, मात्र आईच्या मनाला प्रचंड लागले. मोठ्या माणसाच्या टोपीपर्यंत तुझा हात गेलाच कसा, असे म्हणत बाबाजी गेल्यानंतर आईने मला उसाने फोडून काढले होते. आजही मी तो प्रसंग विसरू शकत नाही. कसे आहे ना, झाडाच्या फांद्या वेळच्या वेळी छाटल्या की ते पसरत नाही. वर वर जात राहते. तसेच माझेही झाले. याचे श्रेय अर्थातच आईचे होते.

माई देवभोळी होती. एखाद्यावर सहज विश्वास टाकणे हा तिचा स्थायीभाव होता. पण व्हायचे काय की, त्यामुळे तिला सहज कुणीही फसवू शकायचे. याबाबतचे अनुभव तिनेही घेतले होते. मागे एकदा एक 50-55 वयाची व्यक्ती आश्रमामध्ये आली होती. त्यांच्या अंगावर मार खाल्ल्याच्या खुणा होत्या. अंगावर काळे-निळे व्रण होते. त्याने आईच्या पायावर पडून रडायला सुरुवात केली. त्याचे रडणे बघून मीही कळवळले. पण यावेळी आईने काय केले असेल? त्यांना सर्वात आधी जेवू घालायला सांगितले. ती व्यक्ती जेवायला गेली, पण मी आईजवळच थांबले. का कुणास ठाऊक पण त्या व्यक्तीवर चटकन विश्वास ठेवण्यास मी तयार नव्हते. या व्यक्तीला का मारलेय, कुणी मारलेय, त्याने काही गडबड तर केली नाहीये ना, पोलिसांकडे जायला हवेय का? असे अनेक प्रश्न मनात येत होते. बरेचदा आपण माणुसकीच्या भावनेने मदत करायला जातो, पण नंतर प्रकरण अंगाशी येते. त्यामुळे मी विचारात पडले होते. आईने माझ्या चेहर्‍यावरचे प्रश्न वाचले. ती हसली आणि म्हणाली, ममता, या क्षणाला त्याची गरज आहे अन्न. आधी त्याचे पोट भरू दे आणि मग तू त्याला हवे तेवढे प्रश्न विचार. आयुष्यातील प्राथमिकता ओळखायला शिक ममता. या क्षणाची गरज ओळखा, पुढचा क्षण तयार असतो, पण हातातून क्षण निसटून गेला तर काहीच उरत नाही. म्हणून क्षण टिपायला शिक हे आईने त्याक्षणी शिकवले.

कळत-नकळत आई आपल्या कृतीतून खूप काही शिकवून जायची. दारात आलेल्या कोणालाही उपाशी पोटी परत पाठवायचे नाही हा तिचा नियम होता. संस्थेमध्ये कुणी आल्यानंतर दोन घास खाऊन जा असा तिचा मायेचा आग्रह नेहमीच असायचा. कदाचित तिच्या आयुष्यात तिला जे उपवास घडले त्यामुळे आल्या माणसाला जेवू घालणे हे तिचे स्वभाववैशिष्ट्य बनलेले असावे. माझ्या वेळेला कोणी आले नाही म्हणून मीही तशीच वागेन, असा तिचा स्वभाव नव्हता; उलट मला कुणी नव्हते म्हणून मी सर्वांना आधार दिला पाहिजे अशीच तिची भूमिका कायम राहिली. आयुष्यात आपले कुणीही नसण्याचे भोग दुसर्‍याच्या वाट्याला येऊ नयेत, असा तिचा प्रयत्न असायचा. आईची समाजसेवा कधीच नियोजित नव्हती. जशी गरज पडेल त्यानुसार ती निर्णय घेत राहिली. आयुष्याने जसे तिला पुढे नेले, परिस्थितीने तिच्यापुढे जे मांडले ते तिने स्वीकारले आणि त्यातूनच ती मार्ग काढत गेली. पण कधीही टाकलेले पाऊल मागे घेतले नाही. अशी ही आई. सर्वांवर मनापासून प्रेम करणारी माय. माझ्या आयुष्यातले तिचे स्थान एखाद्या वटवृक्षासारखे होते आणि राहील.

वयाच्या सत्तरीतही तिच्या कामाचा झपाटा पूर्वीसारखाच होता. भाषणे, दौरे यानिमित्ताने ती सतत फिरत असायची. ‘भाषण नाही तर राशन नाही’ हे भाषणांमधून सांगताना मिळालेली मदत ती संस्थांपर्यंत उभी करत असे. त्यात तिच्या तब्येतीची फार हेळसांड व्हायची. मला आठवतेय 2014 मध्ये तब्बल 23 दिवस हॉस्पिटलमध्ये भरती होती. संपूर्ण शरीरात संसर्ग झाला होता. ती बेशुद्ध होती. आयुष्यभर अविरत धावणार्‍या आईला इतके आजारी असलेले पाहून त्यावेळी काळजी वाढत चालली होती; परंतु त्यातूनही ती सुखरूप बाहेर पडली आणि पुन्हा दौरे, भाषणे यांचा सिलसिला सुरू झाला होता. पण आज अखेर तो संपला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या