Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामहावितरणचे कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर

महावितरणचे कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर

मुंबई/नाशिक Mumbai / Nashik

महावितरण( Mahavitaran) वीज कंपनीचे कार्यक्षेत्र असलेल्या मुंबई उपनगरात अदानी या खासगी कंपनीला वीज पुरवठ्यासाठी परवाना देऊ नये, या मागणीसाठी महावितरणचे कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी आज मध्यरात्री पासून तीन दिवस संपाची ( Strike)हाक दिली आहे. याशिवाय या कर्मचाऱ्यांनी महाजनको आणि महापारेषणमधील खासगीकरणाला विरोध दर्शवला आहे. आज मध्य रात्री पासून सुरु होणाऱ्या आंदोलनात महावितरणचे दीड लाख कर्मचारी सहभागी होणार असल्याने वीज पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

वीज कर्मचाऱ्यांच्या संघर्ष समितीने पुकारलेल्या संपाबाबत ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव, तिन्ही वीज कंपन्यांचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तसेच इतर अधिकारी यांच्यासोबत ३१ संघटनांच्या प्रतिनिधींची सोमवारी बैठक झाली. मात्र, संघटनांच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्याने ही चर्चा फिस्कटली. त्यामुळे संघटना संपावर ठाम राहिल्या आहेत. संघटनांनी संपाची सूचना दीड महिन्यापूर्वी देऊन सुद्धा सरकारने कुठलीही दखल घेतली नाही, याचे पडसाद बैठकीत उमटले. ऊर्जा खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या संपाकडे दुर्लक्ष केल्याने संघटना आक्रमक झाल्या आहेत.

महावितरण कंपनीला चांगला महसूल मिळणाऱ्या भागात अदानी कंपनीला समांतर वीज वितरणाचा परवाना देण्यात येणार आहे. तसेच महापारेषण आणि महाजनको या दोन कंपन्यांमध्ये सुद्धा खासगीकरण करण्यात येणार आहे. या कंपन्यांची उभारणी जनतेसाठी केली असून या कंपन्या जनतेच्या मालकीचा राहाव्यात, अशी भूमिका संघटनांनी बैठकीत मांडली. ऊर्जा खात्याच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी संघर्ष समितीचे म्हणणे ऐकून घेत सरकार संघटनेच्या भूमिकेशी सहमत असल्याचे सांगितले मात्र, त्यावर संघटनांचे समाधान झाले नाही. त्यामुळे संघटना संपावर ठाम असून या संपात उपकेंद्र सहाय्यक,विद्युत सहाय्यक, कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक, प्रशिक्षणार्थी अभियंते, अप्रेंटिस आणि ग्रामविद्युत सहाय्यक सहभागी होणार आहेत.

अखंड वीज पुरवठ्यासाठी महावितरण सज्ज  

महावितरण (Mahavitaran )कंपनीच्या भांडुप परिमंडलातील कार्यक्षेत्रामध्ये अदानी इलेक्ट्रीकल्स कंपनीने वीज वितरणासाठी विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेल्या परवान्याच्या विरोधात राज्याच्या वीज कामगार संघटनांनी आज मध्यरात्रीपासून तीन दिवसांच्या पुकारलेल्या संपकाळात राज्यातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणने संपूर्ण तयारी केली आहे.

वीजपुरवठ्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई येथील मुख्य कार्यालयासह सर्व परिमंडल व मंडल कार्यालयाच्या ठिकाणी संनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आली असून हे नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे. कंपनीने ठरवून दिलेली कामे न करणाऱ्या अधिकारी व कर्मचा-यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. रजेवर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्वरीत कामावर रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे.

संपकाळात वीजपुरवठा अखंडित व नियमित ठेवण्याकरिता महावितरणने नियुक्त केलेल्या एजन्सीचे कामगार, कंत्राटी कामगार, सेवानिवृत्त झालेले अभियंता व कर्मचारी यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत निरीक्षक व महाऊर्जा या विभागातील अभियंत्यांना या संपकाळात विविध उपकेंद्राच्या ठिकाणी नेमण्यात येणार आहे. महावितरणतर्फे नियुक्त करण्यात आलेल्या ज्या एजन्सी या संपकाळात काम करणार नाहीत अशा एजन्सीना तात्काळ बडतर्फ करण्याचे निर्देश देण्यात आले असून वीजपुरवठा सुरळित ठेवण्यासाठी ज्याठिकाणी साहित्याची आवश्यकता भासणार आहे. अशा ठिकाणी आजच साहित्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या अभियंता, तंत्रज्ञ, कर्मचारी, कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवार दि. ४ जानेवारीच्या शून्य तासांपासून ६ जानेवारीपर्यत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. संपात सहभागी असलेल्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्या उपस्थित उद्या दि. ४ जानेवारीरोजी दुपारी १.०० वा. सह्याद्री अतिथी गृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपला प्रस्तावित संप मागे घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरण संपूर्ण काळजी घेत असून याउपरही वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांनी टोल फ्री क्र. १८००-२१२-३४३५, १८००-२३३-३४३५ , १९१२ व १९१२० यावर संपर्क साधावा. यासोबतच नाशिक मंडळातील ग्राहकांनी ७८७५३५७८६१ या क्रमांकावर तसेच मालेगाव मंडळातील ग्राहकांनी ७८७५६५३९५२ या क्रमांकावर संपर्क करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या