Saturday, April 27, 2024
Homeनगरठरवलं तर करेक्ट कार्यक्रम करू

ठरवलं तर करेक्ट कार्यक्रम करू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सर्वसामान्य जनतेला भाजपच्या नेत्यांची सोंगे कळू लागली आहेत. कितीही त्रास द्या, राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्तेला धोका नाही. आम्ही ठरवलं तर विरोधक तिकडे (अटकेत) दिसतील. मात्र, आमचे आमदार हे जनतेचे, शेतकर्‍यांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात व्यस्त आहेत. आम्ही पक्ष आणि जात विरहीत काम करतो. जिल्ह्यातील बाराही मतदारसंघातील भाजपच्या माजी आमदारांचा करेक्ट कार्यक्रम लावू शकतो, असा दम वजा इशारा उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला.

- Advertisement -

नगरमध्ये अल्पसंख्यांक मंत्री नवाब मंत्री यांच्या अटकेच्या निषेधार्थ आयोजित महाविकास आघाडीच्या धरणे आंदोलनप्रसंगी मंत्री तनपुरे बोलत होते. यावेळी शिर्डीच्या साई संस्थांचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. किरण लहामटे, आ. संग्राम जगताप, आ. नीलेश लंके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, संदीप वर्पे, संजय कोळगे, मंजुषा गुंड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दळवी, ज्येष्ठ नेते पांडूरंग अभंग, शिवशंकर राजळे, दीप चव्हाण, अभिजीत खोसे, बाळासाहेब हराळ, विशेष सरकारी वकील अ‍ॅड. सुरेश लगड, राजश्री कोठावळे, सुष्मा आठरे, बाळासाहेब पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

तत्पूर्वी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी बोलतांना राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, भाजप अजूनही स्वत:ला राज्यातील विरोध पक्ष मानण्यास तयार नाही. सत्ता मिळविण्यासाठी सभागृहात आणि सभागृहाबाहेर आरडाओरड करत आहे. वास्तवात भाजपने विरोधपक्ष म्हणून भूमिका बजावली पाहिजे. सर्वसामान्यांचे प्रश्न, शेतकर्‍यांचे प्रश्नांवर आरडाओरड करायला हवी. मात्र, भाजपकडून तसे काही होतांना दिसत नाही. भाजपने केंद्राकडे महाराष्ट्राच्या थकीत जीएसटीच्या पैशासाठी प्रयत्न करावा, 2022 प्रत्येकला घर देण्याची घोषणा केलेल्या केंद्रातील भाजप सरकारने घरकुलाचे अनुदान थकवले आहे. सत्तेसाठी मी पुन्हा येईल, असे म्हणण्याऐवजी सामान्यांचे प्रश्न सोडविले तर उपयोग होईल, अन्यथा अवघड आहे. कॅबिनेट मंत्री मलिक यांचा विषय 1993 चा आहे. त्यानंतर भाजपची सत्ता असतांना भाजपला दहशतवाद, दाऊद का आठवला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आता राज्यात ईडीचा विषय चेष्टेचा झाला आहे. मला देखील ईडीने बोलविले होते. काही दिवसांनी सामान्य माणूस देखील ईडाला घाबरणार नाही, ऐवढी वाईट अवस्था भाजपने ईडीची करून ठेवली असल्याची टीका त्यांनी केली.

आ. तांबे म्हणाले, मंत्री मलिक यांना चुकीच्या पध्दतीने अटक करण्यात आली आहे. भाजपला लोकशाही उध्दवस्त करायची असून ते सर्वसामान्यांसाठी घातक आहे. राज्यातील बहूजन नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न भाजप आणि आरएसएसकडून सुरू आहे. शेतकरी कायदा मागे घ्याला लागला यातच भाजपचा पराभव आहे. आ. काळे म्हणाले, सत्तेच्या बाहेर राहिल्याने भाजपकडून केंद्रीय संस्थांचा चुकीचा वापर करण्यात येत आहे. महाविकास आघाडीचे नेते जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत असून भाजपचा अजेंडा केवळ जातीजातीत तेढ निर्माण करण्याचा आहे. यावेळी आ. लंके, आ. जगताप, आ. लहामटे, घनशाम शेलार, राजेंद्र दळवी, अ‍ॅड. लगड यांच्यासह अनेकांची मनोगत झाली.

भाजप हमसे डरती है!

आंदोलनात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अधिक आक्रमक होते. अनेक वक्त्यांनी हल्लाबोल केला. यावेळी घोषणाबाजीही झाली. ‘भाजप हमसे डरती है, ईडीको आगे करती है’, ‘महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकला नाही, झुकणार नाही’, ‘ईडी झाली वेडी’, अशा घोषणा नेते आणि कार्यकर्त्यांनी दिल्या. साडे अकरा वाजता सुरू झालेले आंदोलन सुमारे दोनच्या सुमारास संपले.

दाऊद मरण्यापूर्वी भारतात येईल

आंदोलनादरम्यान मार्गदर्शन करतांना नगरसेवक नज्जू पेहलवान यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपवाल्यांना काहीही कामधंदे राहिलेले नसल्याने कोणालाही अटक करण्याची भाषा करत आहेत. भाजपवाल्यांमध्ये दम असले तर पाकिस्तांनातून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद याला पकडून आणा आणि नाही आणले तरी दाऊद हा मृत्यूपूर्वी भारतात येईल, त्याचा दफनविधी हा भारतातच होईल, असा दावा नगरसेवक नज्जू पेहलवान यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या