महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या प्रोत्साहनास अनेकजण अपात्र ठरणार

jalgaon-digital
2 Min Read

वीरगाव |वार्ताहर| Virgav

महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना 2019 या योजनेच्या अनुषंगाने पीक कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना आता 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा शासन निर्णय विचाराधीन आहे. या योजनेत अपात्र ठरणार्‍या व्यक्तींचे निकष आता सहकार खात्याने जाहीर केले आहेत. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद सदस्य यांचे बरोबरच सहकार क्षेत्रात काम करणार्‍या अनेक पदाधिकार्‍यांना या योजनेचा लाभ आता मिळणार नाही.

याबाबतचे निकष शासनाच्या सहकार खात्याने जाहीर केले असून महाराष्ट्र राज्यातील आजी-माजी मंत्री, आजी-माजी लोकसभा, राज्यसभा, विधानसभा-विधानपरिषद सदस्य यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. केंद्र आणि राज्य शासनातील 25 हजार रुपयांपेक्षा अधिक मासिक वेतन घेणारे चतुर्थश्रेणी कर्मचारी वगळता इतर सर्व कर्मचारी व अधिकारी यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

एकत्रित मासिक वेतन 25 हजार रुपयांपेक्षा अधिक असणार्‍या राज्य सार्वजनिक उपक्रमातील (महावितरण, एस.टी.महामंडळ इ.) अधिकारी व कर्मचारी त्याचप्रमाणे अनुदानित संस्थांमधील अधिकारी व कर्मचारी यांनाही ही योजना लागू होणार नाही. शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणार्‍या व्यक्तींना या योजनेतून वगळले जाईल.

माजी सैनिक वगळून ज्या निवृत्तीवेतनधारकांचे मासिक निवृत्ती वेतन 25 हजार रुपयांपेक्षा अधिक आहे अशांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सूतगिरणी, नागरी सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सहकारी दूध संघ या संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक त्याचप्रमाणे या सहकारी संस्थांमध्ये कार्यरत असणारे रुपये 25 हजारापेक्षा अधिक वेतन घेणारे अधिकारी या योजनेस अपात्र असतील.

एकंदरीत राजकारणात नियमीत सक्रिय अनेक व्यक्ती या योजनेपासून दूर ठेवल्याने शासनाचा बराच पैसा वाचणार असल्याने आम जनतेने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

नव्या संचालकांना फटका

करोना कालावधीतील टाळेबंदीमुळे सहकारातील सार्‍या निवडणूका रखडल्या.जवळपास सर्वच सहकार विश्वातील सहकारी संस्था आता निवडणूकीस पात्र आहेत. काही निवडणूका झाल्या काही प्रतिक्षेत आहेत. नव्याने निवडणूका झाल्यानंतर अनेक नवीन चेहर्‍यांना पदाधिकारी म्हणून संधी मिळाली. नवीन पदाधिकारी झाल्यानंतर त्यांना झालेल्या आनंदावर शासन निर्णयाच्या जाहीर झालेल्या प्रोत्साहन योजना निकषांमुळे अपात्र ठरल्याने विरजण पडेल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *