Friday, April 26, 2024
Homeनगरनगर येथील मुलींच्या शाळेने महात्मा फुलेंना घातली होती मोहिनी

नगर येथील मुलींच्या शाळेने महात्मा फुलेंना घातली होती मोहिनी

संगमनेर (वार्ताहर) –

सुमारे 175 वर्षांपूर्वी स्त्री, शूद्रांच्या शिक्षणासाठी पाया घालणारे फुले दांपत्य म्हणजे बहुजनांच्या कल्याणाचा मार्ग दाखवणारे समाजाचे

- Advertisement -

उद्धारकर्ते ठरले..आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. क्रांतीज्योती आणि शिक्षण यांचा अनन्य संबंध जोडण्यात येतो, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला प्रशिक्षित शिक्षक आहेत असा सन्मान करण्यात येतो. मुलींचे उत्तम शिक्षण अहमदनगरमध्ये सुरू होते.

या शाळेचा आदर्श घेऊन पुण्यात भारतीयांनी सुरू केलेली पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरू केली. पुण्यातील मुलींच्या शाळेसाठी त्यांनी स्वतःला झोकून देऊन एक नवा इतिहास घडविला.. या इतिहासात नगरचे नाव देखील अजरामर झाले आहे. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापक राहिल्या आहेत. पण पहिली शाळा सुरू करण्यापूर्वी फुले यांनी अहमदनगरच्या शाळेला भेट देऊन त्या दिशेने पावले टाकण्याचा विचार केला होता.

ऑगस्ट महिन्यात 1948 मध्ये बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु झाली. या शाळेत दलित समाजातील मुलींना प्रवेश मिळाला. तेथे वाचन, अंकगणित, व्याकरण आदी विशेष शिकवले जात होते.

पुणे म्हणजे सनातन्यांचा बालेकिल्ला होता. मुलींनी, शूद्र, अतिशूद्र यांनी शिकणे हे पाप मानले जात होते. फुलेंच्या या शिक्षणाच्या प्रवासामुळे त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले आहे. मुलींना शिकवणे म्हणजे धर्मावर मोठा, भयंकर अत्याचार करणे आहे. शाळेत पुरुष मुलींना शिकवतो त्या शाळेत मुली पाठविणे हा सनातन्यांच्या दृष्टीने मोठा अपराध होता. अशा परिस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीला शिकविण्याचा निर्णय घेतला.

दलितांच्या मुलींना शिकविण्यासाठी दुसरा शिक्षक मिळत नव्हता म्हणून सावित्रीची सहाय्यक शिक्षक म्हणून निवड केली. एक हिंदू बाईने शिक्षिका होणे हे धर्मद्रोही, समाजद्रोही मानण्यात आले. पुण्यात संतापाची लाट उसळली. सावित्रीबाईंना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागला. सावित्रीबाई पासूनच हिंदू स्त्री सार्वजनिक क्षेत्रात उतरण्याचा इतिहास सांगण्यात येतो.. त्याचा परिणाम ज्योतिबांना घराच्या बाहेर पडावे लागले हे काम करताना मला मरण आले तरी चालेल पण मी काम सोडणार नाही हा त्यांनी निर्धार केला होता आणि अखेर दोघेही घराबाहेर पडले.

19 शतकातील पहिली मुलींची शाळा कलकत्त्याला सुरू झाली. ती 1819 मध्ये, पण ती अमेरिकन मिशनने सुरू केली होती. 1840 मध्ये पुण्याच्या परिसरातील शाळा उघडल्या गेल्या. स्कॉटिश ख्रिस्त यांनी एक मुलींची शाळा चालवण्याचा उल्लेख सापडतो. त्यात दहा मुली शिकत होत्या. स्वतंत्रपणे मुलींची शाळा काढणारे महात्मा फुले हेच पहिले भारतीय होते. कष्टकरी वर्गाच्या मुलींसाठी शाळा सुरू झाली, मात्र एकूण शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये प्रशिक्षित शिक्षकांची गरज होती. म्हणून त्यांनी सावित्रीबाई फुले यांना प्रशिक्षित केले. मात्र पुण्यातील शाळा सुरू करताना त्यांना जी शाळा भावली होती त्यात अहमदनगर जिल्ह्यातील शाळेचा समावेश होता.

अहमदनगर जिल्ह्यात अमेरिकन मिशनच्या शाळा ज्या पद्धतीने मुलींना शिक्षण देतात ती पद्धत ज्योतीबांनी ज्ञात होती. अहमदनगर येथे शाळा पाहण्यासाठी ते आले होते. अहमदनगर येथे त्यांचे मित्र सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्याकडे राहिले होते. तर ख्रिस्ती मिशनरी मिस फरार या दयाळू व सेवाभावी वृत्तीने करीत असलेले शिक्षणाचे कार्य पाहून ते प्रभावित झाले होते. हे कार्य पाहून त्यांच्या स्री शिक्षणाच्या विचाराला अधिक गती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्या पद्धतीने त्यांना मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था करायची इच्छा होती. त्याच स्वरूपात पुण्यातील पहिली शाळा सुरु झाली.

त्यावेळी हिंदुस्तानातील स्त्री शिक्षणाकडे होणारे दुर्लक्ष याचे दुःख होते. त्यावर मात करून सावित्रीला शिक्षिका करावे म्हणून त्यांनी त्याचे शिक्षण सुरू केले. सावित्रीला त्यांनी शिकवले पुढे शाळा चालवण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण त्यांना दिले. त्या भारतातील पहिल्या प्रशिक्षित शिक्षिका ठरल्या. भविष्यात मुलींच्या शिक्षणासाठी प्रशिक्षित शिक्षिका मिळाव्यात म्हणून त्यांनी नॉर्मल स्कूलमध्ये प्रशिक्षण देण्याची सुरुवात केली. त्या प्रशिक्षण केंद्रातून पहिल्या शिक्षिका म्हणून फातिमा शेख तयार झाल्या त्या भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका ठरल्या.

चार वर्षांत 18 शाळा

ज्योतिबा फुले यांनी 1 जानेवारी 1848 मध्ये भिडेवाडा येथे शाळा सुरू केली. त्यापाठोपाठ महारवाडा, हडपसर, सासवड कसबा पेठ, नायगाव, शिरवळ, तळेगाव ढमढेरे, शिरूर, अंजीर वाडी, करंजे, भिंगार, मुढवे, पुणे, रास्ता पेठ, नाना पेठ, वेताळ पेठ अशा सुमारे 18 शाळा सुरू केल्या तर अहमदनगर जिल्हा लगत असलेल्या ओतूर येथे 5 डिसेंबर 1848 ला शाळा सुरू झाल्याचे आढळते.

सहा मुली ते कोट्यवधी मुली

मुलींना शिक्षण दिल्याशिवाय विकासाची गती मिळणार नाहीत हे फुल्यांनी जाणले होते. त्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेत अवघ्या सहाच मुली प्रवेशित झाल्या होत्या. वर्षभरात ही संख्या सुमारे पन्नासच्या घरात पोहोचली होती. या सहा मुलींमध्ये चार ब्राह्मण, एक धनगर व एक मराठा मुलगी होती. आज फुले यांच्या विचाराने देशभरात शिक्षणाची गंगा पोहोचली आहे. या प्रवाहात कोट्यवधी मुली शिक्षण घेत आहेत. सहा मुलींपासून सुरू झालेला शिक्षणाचा प्रवास आज उंचावत असला, तरी सावित्रीच्या योगदानाची दखल वर्तमानात घेतली जात नसल्याची खंत विचारवंत व्यक्त करत आहेत. फुले यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी इंग्रज सरकारने त्यावेळी दोनशे रुपये व शाल देऊन सत्कार केला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या