Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरआ. बंब यांच्या वक्तव्याचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून निषेध

आ. बंब यांच्या वक्तव्याचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून निषेध

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळात शिकवणार्‍या शिक्षकांच्या संबंधाने वस्तुस्थितीचा विपर्यास करून विधिमंडळात शिक्षकांचा अवमान करणार्‍या आ.प्रशांत बंब यांच्या वक्तव्याचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला.

- Advertisement -

शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत म्हणून शैक्षणिक गुणवत्ता घसरली आहे अशा प्रकारचे वक्तव्य एकांगी आणि वास्तव स्थितीकडे दुर्लक्ष करणारे आहे. प्राथमिक शिक्षकांची बदनामी करून त्यांना दोषी ठरवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा बंद करता येईल आणि शिक्षणाच्या खाजगीकरणाचा मार्ग प्रशस्त करता येईल. परंतु यामुळे गोरगरीब, शोषित- कष्टकरी, शेतकरी-शेतमजुरांच्या पाल्यांच्या शिक्षणाची भविष्यात वाताहत होणार आहे. राज्यातील प्राथमिक शिक्षकांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे वावडे असते तर त्यांनी शिक्षकांना शिकवू द्या, लेकरांना शिकू द्या अशा प्रकारची मागणी करत नुकतेच राज्यभर धरणे आंदोलन केले नसते हे आ. प्रशांत बंब यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून जवळपास प्रत्येक आठवड्यात दोन ते तीन दिवस सारखी प्रशिक्षणे चालली आहेत अशा प्रकारच्या प्रशिक्षण धोरणाचाही फेरविचार करण्याची गरज आहे.राज्यातील प्राथमिक शाळांतील शिक्षकांना दोष देणे सोपे आहे मात्र त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर सकारात्मक विचार करून व्यापक विचार विमर्श करून संघटनांसोबत या संबंधाने चर्चा करून राज्यात शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी एका व्यासपीठावर येऊन धोरण ठरवणे आवश्यक आहे. केवळ शिक्षकांची समाजात बदनामी होईल अशा प्रकारे वक्तव्य करून कोणताही उपयोग होणार नाही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आमदार प्रशांत बंब यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत असून या संबंधाने त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, राज्य सरचिटणीस विजय कोंबे, उपाध्यक्ष राजन कोरगावकर, कार्याध्यक्ष राजेंद्र नवले, कोषाध्यक्ष केदुजी देशमाने,राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी जिल्हा शाखांचे अध्यक्ष, सरचिटणीस आणि सर्व पदाधिकार्‍यांनी आमदार बंब यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या