Saturday, April 27, 2024
Homeनंदुरबार१३ फेब्रुवारी २०१३ नंतर टीईटी प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्त झालेल्या शिक्षकांची मागवली माहिती

१३ फेब्रुवारी २०१३ नंतर टीईटी प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्त झालेल्या शिक्षकांची मागवली माहिती

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

दि.१३ फेब्रुवारी २०१३ नंतर टीईटी प्रमाणपत्राच्या आधारे इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळेत नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांनी मुळ टीईटी प्रमाणपत्र (TET certificate) दि.७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करण्याचे आदेश (Maharashtra State Examination Council) महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने काढले आहेत. गेल्या महिन्यात टीईटीच्या घोटाळयात महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक झाल्यानंतर टीईटीचे मुळ प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे ‘सेटींग’ मध्ये उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरिक्षक मुंबई (दक्षिण, पश्चिम, उत्तर), प्रशासन अधिकारी (म.न.पा/नपा./नप.) यांची काल दि.४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे बैठक आयोजित करण्यात आली होती.

सदर बैठकित दि.१३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षक कर्मचार्‍यांची (प्राथमिक व उच्च प्राथमिक) माहिती व मुळ प्रमाणपत्रे, टीईटी अर्थात शिक्षक पात्रता प्रमाणपत्र पडताळणीसाठी सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यानुसार उमेदवाराचे नाव, महाटीईटी बैठक क्रमांक, पेपर क्रमांक १ व २, उत्तीर्ण वर्ष अशी माहिती मागविण्यात आली आहे. सदर माहिती कालमर्यादित असल्याने दि.७ जानेवारी २०२२ पर्यंत समक्ष आपले अधिनस्त जबाबदार अधिकार्‍यामार्फत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कार्यालयास सादर करावीत.

सदर कार्यवाही वरिष्ठ कार्यालयाचे निर्देशानुसार अतितातडीची असल्याने विलंब होणार नाही, याची सर्व संबंधितांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या उपायुक्त शैलजा दराडे यांनी या बैठकीत केले आहे.

सदर माहिती पुणे येथे ७ जानेवारीपर्यंत सादर करावयाची असल्याने जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांनी सदर माहिती आज दि.५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करण्याचे आदेश संबंधीत शाळा व शिक्षकांना दिले आहेत.

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेतर्फे सन २०१३ पासून टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परिक्षा घेण्यात येत आहे. सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच संबंधीत उमेदवार शिक्षक बनण्यास पात्र ठरतात.

मात्र, या परीक्षेच्या निकालाची टक्केवारी अत्यल्प असल्यामुळे अनेक भावी शिक्षकांची पंचायत झाली आहे. त्यामुळे सदर परीक्षा उत्तीर्ण करुन देणारी दलालांची साखळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या यंत्रणेत निर्माण झाली होती.

अगदी आयुक्तांपासून गावपातळीपर्यंतच्या अनेक दलालांनी या परीक्षेचा अक्षरशः बाजार मांडला होता. जिल्हयातील नंदुरबार, तळोदा, शहादा अक्कलकुवा, शेजारील दोंेडाईचा शहरासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात अनेक दलाल कार्यरत आहेत.

या दलालांचे थेट पुण्यापर्यंत लागेबांधे आहेत. सदर परीक्षा उत्तीर्ण करुन देण्यासाठी १ ते ३ लाख रुपयांचा ‘ रेट’ असल्याचे सांगण्यात येते. सेटींग केलेल्या उमेदवारांना टीईटीचा पेपर कोरा ठेवण्यास सांगून पुणे येथे त्यांची उत्तरे भरली जात असल्याची माहिती उघड होवू लागली आहे.

त्यामुळे आतापर्यंत अनेक उमेदवार सदर परीक्षा अशाचप्रकारे उत्तीर्ण झाले आहेत. जिल्हयात दरवर्षी तीनशे ते चारशे उमेदवार अशाचप्रकारे सेटींगमध्ये उत्तीर्ण होत असल्याची चर्चा आहे. यातून कोटयावधी रुपयांची उलाढाल झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, दि.१७ डिसेंबर रोजी पुणे येथील पोलीसांनी टीईटी परीक्षेच्या घोटाळयाप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून कोटयावधी रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

त्यांच्याकडून टीईटी संदर्भात अनेक धक्कादायक माहिती पोलीसांना मिळाल्याचे समजते. त्यामुळे आता पोलीसांनी चौकशी सुरु केली आहे. उमेदवारांनी स्वतःहून काही गैरप्रकार केला असल्यास तशी माहिती द्यावी, असे आवाहन पोलीसांनी केले होते.

परंतू अद्याप कोणताही उमेदवार पुढे आला नाही. म्हणूनच की काय आता महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने १३ फेब्रुवारी २०१३ नंतर टीईटी परिक्षा उत्तीर्ण होवून नियुक्त झालेल्या शिक्षकांची माहिती मागवली असून त्यांच्याकडून टीईटीचे मुळ प्रमाणपत्र, बैठक क्रमांक अशी माहिती ७ जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे ‘सेटींग’मध्ये टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. आता टीईटीच्या मुळ प्रमाणपत्रांमध्ये किती उमेदवार बोगस आढळतात की हे प्रकरणदेखील चौकशीत ‘मॅनेज’ होते हे लवकरच समजेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या