Saturday, April 27, 2024
Homeनगरमहाराष्ट्र साहित्य परिषद विश्वस्तपदी यशवंतराव गडाख यांची फेरनिवड

महाराष्ट्र साहित्य परिषद विश्वस्तपदी यशवंतराव गडाख यांची फेरनिवड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विश्वस्तपदी ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी खासदार यशवंतराव गडाख यांची फेरनिवड झाली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र साहित्य परिषद कार्यकारी मंडळाची सभा परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पुणे येथे पार पडली. यावेळी प्रमुख कार्यवाहक प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांच्यासह जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद ही अग्रगण्य साहित्य संस्था आहे. 1906 मध्ये स्थापन करण्यात आलेली ही संस्था भाषा, साहित्य, संस्कृती आणि समिक्षा यांचे जतन व संवर्धनाचे काम सातत्याने करीत आहे. आशा मान्यताप्राप्त साहित्य संस्थेवर निवड होणे हा सन्मान असतो.

1997 मध्ये अहमदनगर येथे पार पडलेले 70 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशवंतराव गडाख यांच्या सक्रीय सहभागाने यशस्वी ठरले होते. अर्धविराम हे आत्मचरित्र, सहवास, अंतर्वेध, माझे संचित, कवडसे ही त्यांची पुस्तके वाचकप्रिय ठरली आहेत. या पुस्तक लेखनासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या अंतर्वेध या पुस्तकाला 2012 मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विद्याधर पुंडलिक साहित्य पुरस्कार मिळाला आहे. साहित्य परिषदेवर विश्वस्त म्हणून फेरनिवड झाल्याबद्दल ज्येष्ठ नेते गडाख यांचे अनेकांनी अभिनंदन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या