महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मिटणार? अमित शाह करणार मध्यस्थी

jalgaon-digital
1 Min Read

दिल्ली | Delhi

महाराष्ट्र-कर्नाटक वाद मागील काही दिवसांपासून उफाळून आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापुरातील काही गावांवर दावा सांगितला होता. बोम्मई यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. त्यातच महाराष्ट्रातील ट्रकवर बेळगावात हल्ला करण्यात आला होता.

दरम्यान मागील काही दिवसांपासून सुरू असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता लवकरच मिटण्याची शक्यता आहे. कारण, सीमावादात आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मध्यस्थी करणार आहेत.

महाविकास आघाडीच्या खासदारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची अमित शाहांकडे तक्रार केली. याची गंभीर दखल शाहांनी घेतल्याची माहिती राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली. १४ डिसेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बोम्मई यांच्यासोबत अमित शाह एकत्र चर्चा करणार असल्याचं कोल्हेंनी सांगितलं.

दरम्यान, कर्नाटक विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येथे १९ डिसेंबरपासून बेळगाव येथे सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या निषेधार्थ त्याच दिवशी समांतर असा मराठी भाषिकांचा महामेळावा महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित केला जाणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षास सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना मेळाव्यासाठी निमंत्रण करण्यात आले आहे

बेळगावात ज्या ज्या वेळी कर्नाटक सरकारकडून हिवाळी अधिवेशन घेतले जाते त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती अधिवेशनच्या पहिल्या दिवशी मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करत असते. अधिवेशनाला विरोध म्हणून हा मेळावा होत असतो. यावर्षी देखील हिवाळी अधिवेशनाला विरोध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचा आयोजन केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *