Tuesday, April 23, 2024
Homeराजकीयनवाब मलिकांच्या 'त्या' खळबळजनक आरोपांवर केंद्रीय मंत्र्यांचं प्रत्यूत्तर

नवाब मलिकांच्या ‘त्या’ खळबळजनक आरोपांवर केंद्रीय मंत्र्यांचं प्रत्यूत्तर

मुंबई | Mumbai

देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असून, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी यासंदर्भात मोदी सरकारवर खळबळजनक आरोप केला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राला रेमडेसिविर देऊ नये अन्यथा कंपन्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, अशी धमकी हे इंजेक्शन तयार करणाऱ्या कंपन्यांना केंद्राकडून देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप नबाव मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांच्या आरोपांना केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करुन प्रत्यूत्तर दिलं आहे.

केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘नवाब मलिक यांनी केलेले ट्वीट धक्कादायक आणि खोटे आहेत. त्यांनी दिलेली माहिती ही अर्ध सत्य आणि खोटी आहे. त्यांना वास्तविक माहिती नाही. केंद्र सरकार रेमडेसिवीरच्या पुरवठ्याबाबत सातत्याने राज्य सरकारशी संपर्कात आहे. तसेच कोणत्याही प्रकारे रेमडेसिवीर महाराष्ट्राला पुरवण्यास मदत करत आहे. आम्ही देशातील रेमडेसिवीरचं उत्पादन दुपटीने वाढवत आहोत आणि उत्पादकांना १२ एप्रिलपासून २० हून अधिक प्लांटला तात्काळ परवानगी दिली आहे. महाराष्ट्रातील जनतेला पुरेसा रेमडेसिवीर पुरवठा करणे हे आमचे प्राधान्य आहे,’ असं ते म्हणाले.

तसेच मांडवीय म्हणाले की, ‘सरकारच्या नोंदीनुसार ईओयूचे केवळ एक युनिट आहे आणि सेझमध्ये एक आहे. आम्ही रेमडेसिवीरच्या सर्व उत्पादकांपर्यंत पोहोचलो आहोत. आणि कोणताही रेमडेसिवीरचा साठा अडवण्यात आलेला नाही. मी आपणास विनंती करतो आपण सांगितलेल्या या १६ कंपन्यांची यादी, स्टॉकची उपलब्धतेची माहिती सादर करा. आमचं सरकार लोकांच्या मदतीसाठी सर्व काही करण्यास वचनबद्ध आहे,’ असं मांडवीय यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिकांनी काय म्हटलंय?

केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नसून केंद्र सरकार त्यास नकार देत असल्याचे नवाब मलिक यांनी म्हंटल आहे. करोना बाधित रुग्णांना आवश्यक असलेल्या रेमडेसिवीरचा पुरवठा महाराष्ट्राला करू नका. अन्यथा परवाना रद्द करू असा दबाव केंद्र सरकारने औषध कंपन्यांवर टाकला असून राज्य सरकारने रेमडेसिवीर औषध निर्माण कंपन्यांकडे विचारणा केली असता ही माहिती समोर आल्याचे मलिक यांनी सांगितले.

रेमडेसिवीरचे भारतात १६ निर्यातदार आहेत, ज्यांच्याकडे रेमडेसिवीरच्या एकूण २० लाख कुप्या आहेत. रेमडेसिवीरचे उत्पादन करणार्‍या सात कंपन्यांमार्फतच रेमडेसिवीर विकले जावे असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. मात्र या सात कंपन्या ही जबाबदारी घेण्यास नकार देत असल्याने आता केंद्र सरकारपुढे निर्णय घेण्याचा पेच निर्माण झाला आहे असेही ना. नवाब मलिक म्हणाले.

करोनाचा वाढता प्रार्दुर्भाव लक्षात घेता रेमडेसिवीरची कमतरता भासू लागली असतानाच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या परिस्थितीत महाराष्ट्र सरकारकडे या १६ निर्यातदारांकडून रेमडेसिवीरचा साठा ताब्यात घेऊन गरजूंना पुरवण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशाराही मलिक यांनी दिला आहे. तसेचराज्यात रेमडेसिवीरची आवश्यकता असताना आणि उपलब्धता देखील असताना तात्काळ निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयात ताबडतोब रेमडेसिवीरच्या कुप्या पुरवल्या जाव्यात, अशी मागणीही मलिक यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या