महापारेषणची १० हजार कोटींची योजना

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई । प्रतिनिधी

वीज ग्राहकांना योग्य दाबाचा आणि अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी येत्या पाच वर्षात राज्यात विविध ठिकाणी उपकेंद्रे, अतिउच्चदाब वीज वाहिन्यांचे जाळे आणि इतर विविध कामे करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत यांनी मंगळवारी महापारेषणला दिले.

महापारेषणने तयार केलेल्या पंचवार्षिक योजनेचा आढावा आज डॉ. राऊत यांनी केला. यावेळी त्यांनी मेळघाटसारख्या दुर्गम भागातही योग्य दाबाचा वीज पुरवठा करण्यात यावा. दुर्गम भागातील एकही गाव अथवा पाडा अंधारात राहू नये यासाठी विशेष प्रयत्न करा, असे निर्देशही त्यांनी महावितरण आणि महापारेषण प्रशासनाला दिले.

सन २०१९-२० ते २०२४-२५ या पाच वर्षात राज्यात एकूण ८७ अतिउच्चदाब वीज उपकेंद्रे उभारण्यात येणार असून यामुळे ३० हजार एमव्हीए एवढी क्षमता वाढ होणार आहे. तर १० हजार ७०७ किमी एवढया लांबीच्या अतिउच्चदाब वाहिन्यांचे नवीन जाळे निर्माण होणार आहे. यासाठी १० हजार ८२३ कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे.

महापारेषणचे प्रभारी संचालक संचलन आणि महावितरणचे संचालक संचलन संजय ताकसांडे यांनी या पंचवार्षिक योजनेचे सादरीकरण केले. ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यावेळी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *