Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारजादूगर जितेंद्र रघुवीर तर जळगाव येथील केशवस्मृती प्रतिष्ठानला यंदाचा पुरुषोत्तम पुरस्कार

जादूगर जितेंद्र रघुवीर तर जळगाव येथील केशवस्मृती प्रतिष्ठानला यंदाचा पुरुषोत्तम पुरस्कार

शहादा | ता.प्र.- SHAHADA

येथील श्री.पी.के.अण्णा पाटील फाउंडेशनच्या (Shri.P.K.Anna Patil Foundation) वतीने दरवर्षी सहकारमहर्षि श्री. अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त पुरुषोत्तम पुरस्कार दिले जातात. यंदाचा व्यक्ती स्तरावरील पुरूषोत्तम पुरस्कार पुणे येथील प्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर (Magician Jitendra Raghuveer) यांना तर संस्था स्तरावरील पुरस्कार जळगाव येथील केशवस्मृती प्रतिष्ठानला (Keshavsmriti Pratishthan) प्रदान केला जाणार आहे. पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये व मानचिन्ह असे आहे. ९ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रदान करण्यात येणार्‍या व्यक्ती व संस्था स्तरावरील पुरस्कारांची घोषणा फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक पाटील व सचिव प्रा.मकरंद पाटील यांनी केली आहे.

- Advertisement -

येथील श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनच्या (Shri.P.K.Anna Patil Foundation) वतीने दरवर्षी सहकारमहर्षि श्री. अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त सामाजिक, शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या महाराष्ट्रातील व्यक्ती व संस्थेला पुरुषोत्तम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

संस्था स्तरावरील पुरुषोत्तम पुरस्कार

केशवस्मृती प्रतिष्ठान, जळगाव या सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात गत ३० वर्षापासून सेवाभावी प्रकल्प राबविणार्‍या संस्थेला दिला जाणार आहे.

संस्थेने जळगाव शहरातील भरकटलेल्या मुलांना आधार देणारा समतोल प्रकल्प, जेष्ठ नागरीकांसाठी मातोश्री आनंदाश्रम, बालकांना हक्क मिळवून देण्यासाठी चाईल्ड (लाईन क्र.१०९८) सारखे उपक्रम सेवावस्ती विभागातर्फे राबविले आहेत.

वैद्यकिय क्षेत्रात गरजू रुणांना वेळेवर रक्त पुरवठा करण्यासाठी माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी, नेत्रदान चळवळ व्यापक करण्यासाठी मांगीलालजी बाफना नेत्रपेढी, वस्ती भागात आरोग्यसेवा केंद्र, बाल संस्कार केंद्र, विशेष मार्गदर्शन वर्ग प्रतिष्ठानतर्फे चालविले जातात.

संस्थेमार्फत कौशल्य विकास अभ्यासक्रम शिकविला जात असून भारतीय संस्कृतीचे जतन व तिचा वारसा पुढील पिढीकडे हस्तांतरीत होण्यासाठी भूलाबाई महोत्सवाचे आयोजन केले जाते. शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील महिलापर्यंत पोहचविणे.

आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासाच्या प्रक्रियेत त्यांना सामावून घेणे व त्यांचे सक्षमीकरण करणे यासाठी संवादिनी अभियान महिला व बालविकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, युनिसेफ व महाराष्ट्र शासनाच्या माहिती जनसंपर्क महासंचालनालय यांनी संयुक्तपणे राबविले होते. त्याची उत्तर महाराष्ट्र विभागाची जबाबदारी केशवस्मृती प्रतिष्ठानाने पार पाडली आहे.

व्यक्ती स्तरावरील पुरस्कार

व्यक्ती स्तरावरील पुरुषोत्तम पुरस्कार कोथरुड, पुणे येथील जादुगार जितेंद्र रघुवीर भोपळे यांना दिला जाणार आहे. त्यांनी आजोबा प्रसिध्द जादुगार रघुवीर व वडिल जादुगार विजय रघुवीर यांच्याकडून वयाच्या पाचव्या वर्षापासून जादुचे धडे घेतले असून आतापावेतो दोन हजार पेक्षा अधिक जादुचे प्रयोग २७ देशांत केले आहेत.

जादुच्या प्रयोगांसोबत नाट्य, नृत्य व गायन कलेतही ते पारंगत आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून अभियांत्रीकी (प्रॉडक्शन) ची पदवी तसेच अमेरीकेच्या नॉरफॉल्क येथील विद्यापीठाची एम.एस. पदव्युत्तर पदवी धारण केली आहे.

त्यांना बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नॅशनल डिफेन्स ऍकेडमीच्या पुरस्कारासह त्यांना देशविदेशातील विभिन्न पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

त्यांनी जनतेत जादु या कलेविषयी जागृती निर्माण होण्यासाठी आतापावेतो देश विदेशात कार्यशाळा, शिवीरांचे आयोजन केले असून विविध वृत्तपत्रातून या कलेची माहिती सर्वदूर पोहच होण्यासाठी विपूल लेखन केले आहे.

त्यांच्या या जनजागृतीच्या कार्याचा गौरव म्हणून पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक पाटील व सचिव प्रा.मकरंद पाटील यांनी दिली.पुरस्कार प्रदान समारंभ ९ ऑक्टोबर ला सकाळी ९.३० वाजता पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या