Thursday, April 25, 2024
Homeधुळेघरफोड्या करणारी मध्यप्रदेशातील टोळी गजाआड

घरफोड्या करणारी मध्यप्रदेशातील टोळी गजाआड

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शिरपूर शहरासह परिसरात घरफोड्या करणार्‍या मध्यप्रदेशातील टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या आहेत.

- Advertisement -

तिघांना तिखी तलावाजवळून सापळा रचून पकडण्यात आले. तर चोरीचे दागिने घेणार्‍या सोनाराला पारोळा चौफुलीवर अटक करण्यात आली. त्याच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह पावणेपाच लाखांचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिरपूर शहर व परिसरात चोर्‍या व घरफोड्यांमध्ये वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.

शिरपूर शहर पोलिसात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करत होती. त्यादरम्यान मध्यप्रदेशातील सेंधवा तालुक्यातील मोहाला गावातील काही लोक जिल्ह्यातील शेतावर जागले म्हणून काम करत असून त्यांच्याकडे त्यांचे काही नातेवाईक पाहुणे म्हणून येतात.

जातांना परिसरात चोरी करून जातात, अशी गुप्त माहिती मिळाली. तपासात मोहाला गावातील जतन मोरे व कुवरसिंह मोरे यांनी त्यांचे साथादाराचे मदतीने शिरपूर तालुक्यातील करवंद, वाघाडी व अर्थे गावात घरफोडी चोरी केल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पथकाने संशयिताचा शोध सुरू केला. मात्र त्यांना पोलिसांची चाहूल लागल्याने ते मोहाला गावातून पळून गेले. त्यानंतर ते राहण्याची ठिकाणे सतत बदलत होते. त्यामुळे त्यांना पकडणे मोठे आव्हान झाले होते.

दरम्यान आज हे आरोपी हे त्यांचे साथीदारासह नरव्हाळ (ता.धुळे) येथील एका शेताजवळील तिखी तलावालगत लपून बसले असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली.

त्यावरून पथकाने तेथे सापळा लावून शिताफीने जतन रूमसिंग मोरे (वय 21), कुंवरसिंह सुरसिंग मोरे (वय 22) व लालसिंग रेन्या तडवी (वय 20) सर्व रा. मोहाला, ता. सेंधवा, जि. बडवाणी, मध्यप्रदेश यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीची मोटारसायकल, चांदीचे दागिने व मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आले.

अधिक चौकशीत त्यांनी चोरीतील सोन्याचे दागिने एका सोनाराला विकल्याचे सांगितले. त्याला त्यानुसार सोनारालाही पकडण्यात आले आहे.

शिरपूर शहर पोलिसात दाखल तीन घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. चौघांना शिरपूर शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्याकडून घरफोडी व चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक डॉ.प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलीस उप निरीक्षक हनुमान उगले, पोहेकॉ संजय पाटील, रफीक पठाण, श्रीकांत पाटील, महेंद्र कापुरे पोना प्रभाकर बैसाणे, कुणाल पानपाटील, गौतम सपकाळे, उमेश पाटील, रविकिरण राठोड, विशाल पाटील, किशोर पाटील, तुषार पारधी, मयुर पाटील, योगेश जगताप, दीपक पाटील व कैलास महाजन यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या