भाग्यलक्ष्मी टिकणे आवश्यक – माजी मंत्री पिचड

jalgaon-digital
3 Min Read

अकोले |प्रतिनिधी| Akole

अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. तरी ही निवडणूक बिनविरोध करावी यासाठी आपण सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी, कारखान्याचे सभासद यांना आवाहन करीत असून तालुक्याची ही भाग्यलक्ष्मी टिकली पाहिजे, याकरिता आपण यापुर्वीपासून सर्वांना बरोबर घेत जी निवडणूक बिनविरोधची प्रथा पाडली आहे, तीच पुढे नेण्याची आपली भूमिका असल्याचे राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री व अगस्ति कारखान्याचे संस्थापक चेअरमन मधुकरराव पिचड यांनी जाहीर केली आहे.

श्री. पिचड यांनी अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, अगस्ति सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केल्याचा आपल्याला आनंद आहे. निर्मितीचा जो आनंद असतो तो कशातच नाही. कारखान्याने मात्र तालुक्यातील शेतकर्‍यांच्या उसाला नेहमीच जादा भाव देण्याचा आजपर्यंत प्रयत्न केला आहे. किंबहूना एफआरपी पेक्षाही जास्त भाव दिला.

साखरेबरोबरच इतर उपपदार्थ निर्मितीसाठी इथेनॉल प्रकल्प उभारला. हा कारखाना टिकावा यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहिलो. दरम्यानच्या काळात कारखाना बंद पडला. या काळात कामगार व शेतकर्‍यांचे मोठे नुकसान तर झालेच पण जे नुकसान झाले, त्यामुळे आपण खूपच मागे गेलो. बंद पडलेला कारखाना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपण चालू केला. तेव्हा आपण सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी यांना संचालक मंडळात प्रतिनिधीत्व देत एक नवी प्रथा पाडली. आज राज्यात, देशात अनेक कारखाने फक्त नावाला सहकारी आहेत पण प्रत्यक्षात ते काहींच्या मालकीचे आहेत हे मी सांगायला नको.

अत्यंत लोकशाही मार्गाने आपण कारखाना चालविला. अगस्ति हा खर्‍या अर्थाने सभासदांच्या मालकीचा आहे. हा सभासदांच्याच मालकीचा रहावा हीच आपली प्रामाणिक भूमिका आहे. कारखान्यात आपण कधी राजकारण आणले नाही, त्याकडे कधी आपण राजकीय दृष्टीकोनातून पाहिले नाही. जेव्हा केव्हा अगस्ति कारखाना अडचणीत आला तेव्हा तेव्हा आपण त्यातून सर्वांना बरोबर घेऊन मार्ग काढला. अगस्ति कारखाना ही खर्‍या अर्थाने भाग्यलक्ष्मी आहे. तीच्यावर अनेकांचे संसार अवलंबून आहेत. अनेकांच्या चुली पेटतात.

आज तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पिकणार्‍या उसाला त्यामुळे जागेवरच बाजारपेठ निर्माण झाली. कारखान्याच्या निर्मितीमागचा आपला उद्देशच हा होता की, शेतकर्‍यांचे हाल होऊ नये. तोच अगस्ति आजपर्यंत आपण चालविला. यापुढे देखील सर्वांच्या मदतीने तो आत्मविश्वासाने चालवू यात तिळमात्र शंका नाही. राजकीय संघर्ष जेव्हा जेव्हा होतात तेव्हा त्याचे दुष्परिणाम कारखान्यावर संस्थेवर होतात हे आपण यापूर्वी पाहिले. तेव्हा कारखान्याकडे राजकारण म्हणून न पाहता त्याकडे एक भाग्यलक्ष्मी म्हणून सर्वांनी पहावे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेऊन कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी, आपण याबाबत नेहमीच कारखान्याच्या वार्षिक सभांमधूनही ही भूमिका जाहीर केली असून आजही आपली तीच भूमिका आहे.

राजकारणाच्या पातळीवर जरुर करू पण कारखान्यात करणार नाही. अगस्तिची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी यापूर्वी जसे आपण एकत्र आलो, बैठका घेतल्या तसे एकत्र बसू आणि सर्वसमावेशक संचालक मंडळ देऊ, अगदी माघारीपर्यंत आपली कुणाशीही चर्चा करण्याची भूमिका आहे. अगस्ति कारखाना ही तालुक्याची शिखर संस्था असून तीचे हित जोपासण्यासाठी आपले एक पाऊल मागे येण्याची देखील तयारी असून कारखान्याचे सभासद, कर्मचारी यांचे हित आपल्याला महत्त्वाचे वाटते. ते जपण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन श्री. पिचड यांनी केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *