Friday, April 26, 2024
Homeनगरकाँग्रेस ही भाजपाची बी टीम असल्याचा आरोप खोडसाळपणाचा - नवले

काँग्रेस ही भाजपाची बी टीम असल्याचा आरोप खोडसाळपणाचा – नवले

अकोले |प्रतिनिधी| Akole

काँग्रेस ही भाजपची बी टीम असल्याच्या टिकेमध्ये कोणतेही तथ्य नाही. उलट अनेक मतदारसंघात काँग्रेस पक्षच भाजपाचा प्रमुख प्रतिस्पर्धी होता, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठनेते व जिल्हा बँकेचे संचालक मधुकरराव नवले यांनी केले. आत्मसन्मान राखूनच काँग्रेस पक्ष भविष्यात अकोले तालुक्यात राजकारण करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

अभिनव शिक्षण संस्थेच्या सभागृहात काल काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेत आपली निवडणुकीतील व आगामी राजकीय भूमिका स्पष्ट केली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठनेते सोन्याबापू वाकचौरे, मिनानाथ पांडे, कार्याध्यक्ष बाळासाहेब नाईकवाडी, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष विक्रम नवले, नगरसेवक प्रदीप नाईकवाडी, महिला काँग्रेस शहराध्यक्ष वनीता शेटे, विठ्ठल नाईकवाडी, साईनाथ नवले आदी मान्यवर उपस्थित होते

नवले म्हणाले, अकोले नगरपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत मतदारांनी भाजपाला स्पष्ट बहुमत दिले, तर राष्ट्रवादी-सेना आघाडीची चांगलीच पडझड झाली. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे काही कार्यकर्ते काँग्रेस ही भाजपची बी टीम असल्याच्या वल्गना करीत होते. काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरपंचायत निवडणुकीत 11 उमेदवार स्वबळावर उभे होते. त्यात आमचा एक उमेदवार निवडून आला. तीन उमेदवार अल्प मताने पडले. आम्हाला 16 टक्के मते पडली. निवडणुकीत आमचे इप्सीत आम्ही साध्य केले आहे. मात्र, भाजपला जोरदार टक्कर ही काँग्रेस पक्षानेच दिल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही शहराच्या विकास कामाचा आराखडा ठेवून निवडणूक लढविली होती. तर निवडणुकीत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व आमदारांनी मूल्यांकन करून आत्मपरीक्षण करावे. जागा किती जिंकले? यापेक्षा राजकारण कोठे मोजले जात नाही, याचा विचार करावा. निवडणुकीत पक्षाने पैशावर निवडणूक लढविली नाही. यापुढे नेतृत्वाने शहाणपणा दाखवून आघाडी करावी. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते निवडणुकीच्या बाहेर राहिले. आणि संघटनशक्तीचं दिवाळं निघाले, याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. असेही नवले यांनी सांगितले.

ज्येष्ठनेते मीनानाथ पांडे म्हणाले, काँग्रेस पक्ष हा देश पातळीवरचा असून स्वतंत्र लढ्याची व त्याची परंपरा आहे. परंतु हा पक्ष विजयाने उन्मत्त झाला किंवा परभावाने खचला नाही. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अस्तित्व ठेवून तडजोडी करायला सांगितल्या होत्या. ज्या प्रभागात काँग्रेस पक्षाची ताकद आहे, तेथे उमेदवारी सन्मानपूर्वक द्यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाची होती. परंतु त्या जागेवर सेना व राष्ट्रवादी आग्रही झाल्यामुळे आघाडी होऊ शकली नाही. परंतु या दोन पक्षाने पराभवाचे खापर काँग्रेस पक्षावर फोडले आहे. त्यामुळे अकरा जागांवर काँग्रेसने निवडणूक लढविली होती. त्यात एक प्रदीप नाईकवाडी विजयी झाले. मागील पंचवार्षिकमध्ये नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील विकास झाला नसलेल्याला भाजपाबरोबर राष्ट्रवादीही जबाबदार आहे.

परंतु काहींनी अगोदरच निकाल लावून टाकला होता. तर यातून काँग्रेस पक्षाला बदनाम केले जात आहे. आम्ही भाजपाला मदत केली नसून सर्व पक्षाशी समान अंतर ठेवले आहे. यामुळे काँग्रेस पक्ष नाउमेद न होता, न खचता अकोले शहराच्या समस्या सोडविणार आहोत. यापुढे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने एकला चलोची भूमिका न घेता आघाडी म्हणून काम करावे. तसेच शहरातील प्रश्नासाठी प्रसंगी आंदोलनाचे मार्गाने जाऊन प्रश्न सोडविणार असल्याचे पांडे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या