Thursday, April 25, 2024
Homeनगरनवले, साळुंके जिल्हा बँकेचे तज्ज्ञ संचालक

नवले, साळुंके जिल्हा बँकेचे तज्ज्ञ संचालक

अहमदनगर l प्रतिनिधी

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे तज्ज्ञ संचालक म्हणून अकोले तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांची निवड करण्यात आली. दोन्ही तज्ज्ञ संचालक महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या मर्जीतील काँग्रेसचे नेते आहेत.

- Advertisement -

जिल्हा सहकारी बँकेतील तज्ज्ञ संचालक निवडीसाठी बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी शुक्रवारी बैठक बोलावली होती. या बैठकीला बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, सीताराम गायकर, अनुराधा नागवडे, अमित भांगरे, गणपतराव सांगळे, राहुल जगताप आदी उपस्थित होते. बँकेत २१ संचालक आहेत. निवडणूक सहा महिन्यांपूर्वी झाली होती. बँकेतील तज्ज्ञ संचालकांची निवड शुक्रवारी करण्यात आली. बँकेत संचालकपद मिळविण्यासाठी अनेकांनी जिल्ह्यातील नेत्यांकडे फिल्डिंग लावली होती. अखेर शुक्रवारी बैठकीत साळुंके व नवले यांची निवड जाहीर करण्यात आली.

काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बाळासाहेब साळुंके यांच्या पत्नी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका तथा पंचायत समितीच्या माजी सभापती मिनाक्षी साळुंके यांना केवळ एका मताने पराभव स्विकारावा लागला होता. मात्र हा पराभव केवळ तालुक्याच्याच नव्हे तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही जिव्हारी लागला होता. कारण मतदानाच्या अगोदर झालेल्या नाट्यमय खेळीची आणि त्यातच जवळ राहून कुरघोड्या केलेल्या तालुक्यातील अनेक नेत्यांच्या छुप्या डावाची चर्चाही लपून राहिली नाही. उपमुख्यमंत्री पवारांनी मुंबईतील एका कार्यक्रमात गद्दारी केलेल्या कर्जत तालुक्यातील स्थानिक नेत्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. विजयाची खात्री असतानाही पराभवासाठी अप्रत्यक्षपणे घडवून आणलेल्या घडामोडींनी आ. रोहित पवारांचीही निराशा झाली. एकाच गोटात राहून घडलेला सर्व नाट्यमय प्रकार पाहता उपमुख्यमंत्री पवारांनी साळुंके यांना निवडीबाबत शब्द दिला होता. राष्ट्रवादीच्या कोट्यातून जागा देत तज्ज्ञ संचालक म्हणून निवड करत त्यांनी दिलेला शब्द तंतोतंत पाळला. महसूलमंत्री थोरात यांनीही साळुंके यांच्या निवडीसाठी आग्रही भूमिका घेतली होती.

जिल्हा सहकारी बँक, व सहकारी साखर कारखानदारी तसेच सहकारी दूध संघ या संस्था शेतकरी आणि ग्रामीण जनता यांच्या डोक्यावर असलेली मायेची व आधाराची सावली आहे. या सहकारी संस्था उत्तम रीतीने चालाव्यात सहकार अधिक वृद्धिंगत व्हावा, ग्रामीण अर्थ व्यवस्था उभी राहणार नाही हे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सुस्पष्ट झाले आहे. म्हणून केंद्र सरकारने सहकार मंत्रालय सुरू केले. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हीच जाणीव ठेवून काम करणे आवश्यक आहे. या सहकारी संस्था उत्तम रीतीने सांभाळाव्यात व जनतेचे विश्वस्त म्हणून या संस्थांमध्ये काम करावे हे शहाणपण आम्हाला स्वर्गीय, श्रद्धेय भाऊसाहेब थोरात व नामदार बाळासाहेब थोरात यांनी शिकवलं आहे. या विचाराला कायम जपण्याचं काम कार्यकर्ता म्हणून मी पूर्णपणे पार पाडील. शेतकऱ्यांचा व ग्रामीण जनतेची ही सहकारी बँक आधारवड राहील याची दक्षता घ्यावी.

– मधुकरराव नवले, नूतन तज्ज्ञ संचालक

जिल्हा बँक तज्ज्ञ संचालक म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, आ. रोहित पवार यांनी संधी दिली. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला योग्य न्याय मिळवून दिला. याचे समाधान आहे.

बाळासाहेब साळुंके, नूतन तज्ज्ञ संचालक, जिल्हा बँक

- Advertisment -

ताज्या बातम्या