Wednesday, April 24, 2024
Homeनगरमढेवडगाव सोसायटीचे पिककर्ज रोखले

मढेवडगाव सोसायटीचे पिककर्ज रोखले

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील मढेवडगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी व जिल्हा बँकेच्या मढेवडगाव शाखेचा अजब कारभार सुरू असल्याने ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर सभासद शेतकर्‍यांना कर्ज मागण्यास गेले असता उडवाउडवीची उत्तरे देऊन कर्ज देण्यापासून जाणूनबुजून रोखले जात आहे. येत्या पाच दिवसात कर्ज वाटप न केल्यास 31 मे रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य जिजाबापू शिंदे व अंबादास मांडे यांनी तहसीलदार मिलिंद कुलथे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

- Advertisement -

निवेदनात म्हटले आहे की, मढेवडगाव सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून18 जून रोजी मतदान आहे. परंतु सत्ताधार्‍यांनी अंतर्गत राजकारणाला सुरुवात करून ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर विरोधक सभासदांना कर्जवाटपापासून वंचित ठेवण्यात येत आहे. 31 मार्च पूर्वी 310 सभासदांनी विहित वेळेत कर्जाची परतफेड केली आहे. जिल्हा बँकेने कर्जफेड केल्यावर तात्काळ कर्ज देण्याचे आश्वासन दिले होते.

परंतु सेवा सोसायटीने जिल्हा बँकेच्या आदेशाला हरताळ फासून मर्जीतील 35 सभासदांना कर्जवाटप व एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींना कर्जवाटप केले आहे. तर नियमात बसणार्‍या 310 सभासदांना उडवाउडवीची उत्तरे देऊन कर्जापासून वंचित ठेवण्याचा अजब प्रकार चालू आहे. येत्या पाच दिवसांत कर्ज मिळाले नाही तर मंगळवार रोजी सर्व सभासदांना बरोबर घेत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

बँक धोरणानूसार कर्जवाटप

काही सभासद स्वतः थकबाकीत आहेत पण संस्थेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सातत्याने संस्थेची बदनामी करण्यासाठी खोटेनाटे आरोप संस्थेवर व संचालकावर करून संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. संस्थेची कर्जवाटप धोरणे जिल्हा बँकेच्या परिपत्रकानुसार चालतात. संस्थेतील कुठलेही सभासदाची कोणत्याही प्रकारची अडवणूक संस्थेचे पदाधिकारी किंवा कर्मचारी करत नाहीत. असा खुलासा विद्यमान अध्यक्ष वाबळे यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या