Saturday, April 27, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार येथील देवरे दाम्पत्याने तयार केले ‘फोल्डेबल बेबी बर्थ’

नंदुरबार येथील देवरे दाम्पत्याने तयार केले ‘फोल्डेबल बेबी बर्थ’

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURB AR

येथील श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील (Mrs. H. G. Shroff High School and Junior College) प्रा.नितीन देवरे (Prof. Nitin Deore) व सौ.हर्षाली देवरे (Mrs. Harshali Deore) या दाम्पत्याने रेल्वेच्या डब्यासाठी (train car) फोल्डेबल बेबी बर्थ (Foldable baby birth) तयार केले आहे. सदर फोल्डेबल बेबी बर्थ हे लहान मुल व आईसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे. या बेबीबर्थमध्ये कंपोझिट लॉकींग यंत्रणा वापरण्यात आली आहे, त्याचे पेटंट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु असून ते इंडियन पेटंट जर्नलमध्ये (Indian Patent Journal) प्रकाशित झाले आहे.

- Advertisement -

रेल्वेतील सध्याच्या लोवर बर्थमध्ये आई व बाळ दोघांना झोपण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांना रात्रभर छोट्याश्या जागेत अडखळत झोपावे लागते. बाळ मोकळ्या बाजूला झोपलेले असेल तर खाली पडण्याची भिती असते. त्यामुळे रात्रभर अडखळत झोपणे हे दोघांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. अशावेळी फोल्डेबल बेबी बर्थ हा यावरील सक्षम उपाय ठरू शकतो.

फोल्डेबल बेबी बर्थ हा ७६ सेमी बाय २३ सेमी आकाराचे आहे. यामध्ये बाळ झोपेत खाली पडू नये म्हणून विशेष सोय केलेली आहे. या बर्थची रचना बाळाला दुखापत होणार नाही याप्रकारे करण्यात आली आहे. कमी वजनाच्या पण मजबूत व टिकाऊ वस्तुंचा वापर यात करण्यात आला आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या लोवर बर्थ ला हे फोल्डेबल बेबी बर्थ जोडले तर बाळ हे या बर्थ वर झोपू शकते. त्यामुळे लोवर बर्थ हा आईला झोपण्यासाठी पूर्णपणे मोकळा होवू शकतो. आवश्यकता नसल्यास बेबी बर्थ, लोवर बर्थच्या खाली फोल्ड करता येते, त्यामुळे बसून प्रवास करण्याच्या स्थितीत हा बर्थ अडथळा ठरत नाही. या फोल्डेबल बर्थचा प्रौढ व्यक्तींना मेडिसिन किंवा इतर वस्तू ठेवण्यासाठी देखील फायदा होऊ शकतो.

या बेबी बर्थचा वापर करतांना सध्या अस्तित्वात असलेल्या लोवर बर्थ मध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाही. झोपेत बाळ खाली पडू नये म्हणून संरक्षक बेल्टची सोय करण्यात आली आहे. रेल्वे कोचमध्ये इतरांना अडथळा होणार नाही अशाप्रकारे या बर्थची रचना करण्यात आली आहे. विशेषतः महिलांना हताळण्यास ते अत्यंत सोपे आहे. विशेष म्हणजे बर्थसाठी विजेच्या वापराची गरज नाही.

सदर प्रोजेक्टमध्ये कंपोझीट लॉकिंग यंत्रणा वापरण्यात आली आहे. ज्यासाठीचे पेटंट नुकतेच इंडियन पेटंट ऑफिस च्या जर्नल मध्ये प्रकाशित झाले आहे. संशोधक नितीन देवरे व हर्षाली देवरे यांनी हे पेटंट सादर केलेले आहे. सदर पेटंट हे २६ नोव्हेंबर २०२१ रोजी इंडियन पेटंट जर्नल मध्ये प्रकाशित झाले आहे. सदर पेटंट मधील माहितीनुसार ही कंपोझीट लॉकिंग यंत्रणा रेल्वे, ऑटोमोबाईल तसेच फोल्डेबल फर्निचरमध्ये देखील वापरता येते.

या प्रोजेक्ट विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://youtu.be/YaWEh7ULtfk या युट्युब लिंकवर उपलब्ध आहे. अजून काही माहिती हवी असल्यास ९४२०४४००७४ या क्रमांकाशी संपर्क करावा असे आवाहन संशोधक प्रा.नितीन देवरे व सौ.हर्षाली देवरे यांनी केले आहे.

रेल्वेतून प्रवास करतांना अनेक महिलांना त्यांच्या लहान मुलांना सोबत घेवून जाणे अडचणीचे ठरते. सध्याच्या रेल्वे बर्थमध्ये बाळाला झोपण्यासाठी कोणतीही सोय नाही, त्यामुळे बर्थमध्ये महिलांना झोपणे अडचणीचे ठरते. हा त्रास आम्हीदेखील रेल्वेत प्रवास करतांना सहन केला आहे. त्यामुळे बेबीबर्थची कल्पना आली. सदर बेबीबर्थ बाळ व आई दोघांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. रेल्वेतील सद्यस्थितीतील लोअर बर्थचा विचार करुन फोल्डेबल बेबीबर्थ तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय रेल्वेने त्यात सुधारणा करुन ते प्रत्यक्ष अस्तित्वात आणावे, प्रत्येक बोेगीमध्येे किमान एक बेबीबर्थ असावे, अशी अपेक्षा आहे. –

प्रा.नितीन देवरे, सौ.हर्षाली देवरे नंदुरबार

- Advertisment -

ताज्या बातम्या