Thursday, April 25, 2024
Homeनाशिकरानवड कारखाना हंगामाला दिवाळी मुहूर्त

रानवड कारखाना हंगामाला दिवाळी मुहूर्त

निफाड | प्रतिनिधी | Niphad

रासाकासाठी (Rasaka) आतापर्यंत 1137 शेतकर्‍यांनी 1053 हेक्टर ऊस नोंदणी केली असून मशिनरी दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात असून डिस्टलरीची क्षमतादेखील वाढवण्यात येत आहे…

- Advertisement -

बायोगॅसचे कामदेखील सुरू असून कामगार वसाहतीची दुरुस्ती, पाणी, रस्ते आदी कामे पूर्णत्वास येत असून दसर्‍याच्या मुहूर्तावर बॉयलर अग्निप्रदीपन तर दिवाळीला प्रत्यक्ष गाळप हंगाम सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे आ. दिलीप बनकर (Dilip Bankar) यांनी म्हटले आहे.

साखर कारखाना भाडेतत्त्वावर घेणारी स्व. अशोकराव बनकर पतसंस्था ही एकमेव संस्था ठरली असून तालुक्यातील बंद पडलेला रासाका आ. बनकर यांच्या नेतृत्वाखालील पतसंस्थेच्या माध्यमातून पुन्हा सुरू होत आहे.

दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या व रासाकाला जोडणार्‍या सर्वच रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे. तर रासाकासाठी अद्ययावत नवीन इमारतीचे व प्रवेशद्वाराचे काम सुरू आहे.

तर 2 कोटी 63 लाख लिटर क्षमतेच्या तळ्याचे काम पूर्ण होऊन त्यात पाणी टाकणे सुरू आहे. तसेच जुने असलेल्या एक कोटी लिटर क्षमतेच्या शेततळ्याचीदेखील दुरुस्ती करण्यात येत असून त्यातदेखील पाणी साचवले जाणार आहे. तसेच रासाका परिसरातील पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात आली असून विद्युतपुरवठा सुरळीत राहावा यासाठी जीर्ण झालेले पोल, केबल बदलण्यात येत आहे.

तर कामगार वसाहतीची दुरुस्ती तेथील पाणीपुरवठा योजना, वीज आदींची कामे प्रगतिपथावर सुरू आहेत. रासाकाची पूर्वीची असलेली डिस्टलरीची 30 हजाराची क्षमता वाढवून ती 45 हजार करण्यात येत आहे. तर कारखानाअंतर्गत असणार्‍या मशिनरीची दुरुस्ती अंतिम टप्प्यात आली आहे.

रासाका कार्यस्थळावरील विजेचा 500 चा ट्रान्सफॉर्मर बदलून नव्याने बसवण्यात आला आहे. तर रासाकासाठी 1137 शेतकर्‍यांनी 1053 हेक्टर उसाची नोंद केली असून कामगारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. तर आवश्यक असलेले कामगार रुजू करून घेण्यात आले आहेत.

रासाकात ऊस गाळपाबरोबरच पूरक उद्योग म्हणून शेतकर्‍यांना त्यांच्या उसाचा मोबदला देणे सुलभ होणार आहे. रासाका परिसर पुन्हा वनराईने बहरावा यासाठी वृक्षारोपण करण्यात आले आहे.

फळझाडे व फुलझाडे लावण्यात आली असून रस्त्याच्या कडेला झाडे, रस्ता दुभाजक याबरोबरच वर्षभर पुरेल एवढ्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. एकूणच दसर्‍याच्या मुहूर्तावर बॉयलर पेटवून दिवाळीत रासाकाचा गाळप हंगाम सुरू करण्याचे संकेत मिळत आहेत.

ऊस वाहतूक ठेकेदारांना आगाऊ रकम

रासाकाचे ऊसतोडणी कामगार, वाहतूक ठेकेदार यांना कामापोटी आगाऊ रकमेचा पहिला हप्ता 20 ऑगस्ट रोजी देण्यात आला. तालुक्यातील 66 ठेकेदारांकडे 35 ट्रॅक्टर व 65 जुगाड तसेच आगाऊ रक्कम न घेता काम करणारा ठेकेदार यांच्याकडील 10 ट्रॅक्टर व 66 जुगाड अशा एकूण 45 ट्रॅक्टर व 131 ट्रॅक्टर जुगाड यांच्या माध्यमातून दररोज 2400 मेट्रिक टन ऊसपुरवठा कारखान्याला होणार आहे.

या ठेकेदारांना आगाऊ रकमेचा पहिला हप्ता आ. दिलीप बनकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी पतसंस्था चेअरमन रामभाऊ माळोदे, कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनील दळवी, मुख्य शेतकी अधिकारी चंद्रकांत आंधळे, अविनाश बनकर, सोमनाथ लोखंडे, राहुल बावस्कर, नारायण खरात, नारायण घुगे, माणिक टर्ले, भास्कर डेर्ले, भाऊसाहेब सोनवणे यांच्यासह 66 ठेकेदार उपस्थित होते.

रासाका डिस्टलरीत इथेनॉल बनवण्यात येणार असून त्याची क्षमता प्रतिदिन 30 हजार लिटरवरून 45 हजार करण्यात येणार आहे. तर यासाठी प्रदूषण होऊ नये म्हणून 90 लाख लिटर क्षमतेच्या बायोगॅसचे काम युद्धपातळीवर सुरू असून इथेनॉल प्रकल्पासाठी स्वतंत्र बॉयलरची निर्मिती करण्यात आली आहे. ही डिस्टलरी 300 दिवस चालवण्याचा मानस आहे. राज्य शासनाने रासाकाच्या गळीत हंगामाला परवानगी देताच कारखाना सुरू करण्यात येईल. त्यासाठी कारखान्यात युद्धपातळीवर कामे सुरू आहेत. तालुक्यातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात उसाची नोंददेखील केली असून दिवाळीत गाळप हंगाम सुरू करण्याचा मानस आहे.

– रामभाऊ माळोदे, चेअरमन (स्व. अशोकराव बनकर पतसंस्था)

- Advertisment -

ताज्या बातम्या