Saturday, April 27, 2024
Homeनगरलम्पी रोगांमुळे पशुपालकांनी घाबरून जाऊनये

लम्पी रोगांमुळे पशुपालकांनी घाबरून जाऊनये

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

ढगाळ वातावरण आणि हवामानामध्ये होत असलेल्या सततच्या बदलामुळे जनावरांच्या आरोग्यावर ताण पडतो. यामुळे जनावरांना वेगवेगळे रोग होण्याचा धोका असतो. याचाच एक भाग म्हणुन जनावरांमध्ये लम्पी स्कीन हा रोग आढळून येत आहे. जनावरांना लम्पी स्कीन हा रोग कॅप्री पॉक्स या विषाणुमूळे होतो. पशुपालकांनी घाबरून न जाता वेळीचं उपाय योजना करावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे पशुसंवर्धन विभागाचे प्रमुख डॉ. विठ्ठल विखे यांनी दिली.

- Advertisement -

कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर, पशुवैद्यकीय केंद्र अस्तगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रांजणगाव ता. राहाता येथे लम्पी स्कीन या रोगाबाबत जनजागृती आणि घ्यावयाची काळजी याविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याविषयी केंद्राचे पशुसंवर्धन शास्त्रज्ञ डॉ. विठ्ठल विखे यांनी सांगीतले, या रोगामुळे जनावरांच्या अंगावर गाठी येतात, जनावरांना ताप येतो, नाका डोळ्यातून चिकट स्त्राव येतो. काही जनावरांच्या पायांना सुज आल्यामुळे जनावरे लंगडतांना दिसतात अशा प्रकारची लक्षणे जाणवतात.

लंपी स्कीन हा एक संसर्गजन्य रोग असून गोठ्यामध्ये चावणार्‍या माशा, डास यांच्यामार्फत या रोगाचा प्रसार होतो. तसेच दूषित खाद्य, पाणी हे या रोगास कारणीभूत होतात. या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गोठ्यामध्य गोचिड, डास, माशा यांचा नायनाट करावा. तसेच रोगबाधित जनावरे वेगळी बांधावीत. गोठ्यामध्ये नियमित सोडीयम हायपोक्लोराईड याची फवारणी करावी. गोठा नेहमी स्वच्छ व हवेशीर ठेवावा. गावामध्ये रोगबाधीत जनावरे आढळल्यास ते वेगळे बांधावेत व गावातील इतर जनावरांना पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून लंपी स्कीन या रोगावरील गोट पॉक्स वॅक्सीनचे लसीकरण करून घ्यावे. तसेच जनावरांची खरेदी-विक्री बंद करावी.

डॉ. उमेश पंडुरे म्हणाले, गोठ्यात स्वच्छता राखा, लिंबाच्या पानांचा धूर करा. सोडियम हाय पोक्लोराइड, फिनेलची फवारणी करा. गोठ्यात चिलटे, डास, माशा, गोचीड होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. पंडुरे यांनी केले. कार्यक्रमासाठी सरपंच सोपानराव कासार, उपसरपंच राजेंद गाढवे, दादासाहेब गाढवे, बाबासाहेब गाढवे, महेश कासार, राजाभाऊ गाढवे, दत्तात्रय कासार, माजी सरपंच सुर्यभान गाढवे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या