Friday, April 26, 2024
Homeनगरलम्पी विरोधात आता पशूसंवर्धन मंत्रीविखे पाटील मैदानात

लम्पी विरोधात आता पशूसंवर्धन मंत्रीविखे पाटील मैदानात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात दिवसंदिवस लम्पीचा विळखा आणखी घट्ट होतांना दिसत आहे. पशूसंवर्धन विभागात लम्पी विरोधात लढा देत असतांना आता राज्याचे पशूसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लम्पीशी मुकबाला करण्यासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जिल्हा प्रशासन आणि पशूसंवर्धन विभागाच्या अधिकार्‍यांनी आणि डॉक्टर यांची आज (दि.10) नगरला बैठक बोलावली आहे. या बैठकीत मंत्री विखे पाटील काय सुचना देणार याकडे शेतकर्‍यांचे लक्ष राहणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, लम्पी रोगाची कोणतीही लक्षणे दिसत नसतील आणि आपला परिसर बाधित जनावरांच्या 5 किलोमीटर परिघात नसेल तर उगाच लम्पीचे लसीकरण करण्याची गरज नाही. सरकारी डॉक्टरांकडे मोफत लस उपलब्ध आहे. त्यामुळे त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपचार करा. लम्पी आजार उपचारानंतर हमखास बरा होतो. शेतकर्‍यांनी उगाच घाबरून जाऊ नये, असा सल्ला पशुसंवर्धन अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना दिला आहे.

जिल्ह्यात लम्पी आजाराची जनावरे आढळत असून त्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बाधित स्थानापासून पाच किलोमीटर परिसरात लम्पीचे लसीकरण पशुसंवर्धन विभागाने तातडीने सुरू केले आहे. शिवाय हे लसीकरण पशुसंवर्धन विभागाकडून मोफत करण्यात येत आहे. लम्पीच्या धास्तीने अनेक शेतकरी जनावरांच्या खासगी डॉक्टरांकडून लसीकरण करून घेत आहेत. खासगीत ही लस 112 रूपयांना मिळते. खासगी डॉक्टरांचे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे दर आहेत. त्यामुळे हा अनावश्यक खर्च करू नका. शिवाय खासगी डॅाक्टर लम्पी बाधित जनावरांच्या क्षेत्रात लसीकरण करण्यासह इतर भागातही जातात. त्यामुळे त्यांच्याकडूनही संसर्गाचा धोका वाढू शकतो. लम्पीची लस थंड तापमानात

जतन करून ठेवावी लागते. हे तापमान राखले जाणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या सूचनांनुसार एका सुईने एकच लस दिली जाते. ती सुई पुन्हा वापरू नये. शिवाय ती सुई व लसीकरणाचे इतर साहित्य शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करावे लागते. ही खबरदारी घेतली जाते का? हे शेतकर्‍यांनी तपासावे. अन्यथा उगाच आजाराला निमंत्रण देऊ नये. शिवाय लसीकरणाच्या नावाखाली कोणालाही जादा पैसे देऊ नये, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून शेतकर्‍यांना करण्यात आले आहे.

दुसरीकडे जिल्ह्यात आतापर्यंत 53 ठिकाणी 179 जनावरे लम्पीने बाधीत आढळली आहेत. त्यामुळे 273 गावांतील 5 किलोमीटर परिघातील 3 लाख 12 हजार 177 जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यापैकी 1 लाख 62 हजार 200 जनावरांचे लसीकरण आतापर्यंत झाले आहे. दरम्यान, पशूसंवर्धन मंत्री विखे पाटील यांच्या आजच्या बैठकीला जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा उपायुक्त पशूसंवर्धन विभाग, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी आणि जिल्ह्यातील एलडीओ ( पशूवैद्यीक), विस्तार अधिकारी पशूसंवर्धन आणि सहाय्यक उपायुक्त पूशसंवर्धन हे उपस्थित राहणार आहेत.

मृतांची संख्या 12

लम्पीमुळे जनावरांचा मृत्यू होत नसल्याचा दावा पशूसंवर्धन विभागाने आधी केला होता. मात्र, कोविड प्रमाणे आता जनावरांमध्ये अन्य जीवघेण्या आजारात लम्पीची लागण होत असल्याने जनावरांचे मृत्यूचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 12 जनावरे मृत पावली असून यात सर्वाधिक कर्जत तालुक्यात 4, राहुरी आणि राहाता प्रत्येकी 2, तर पारनेर, पाथर्डी, श्रीरामपूर आणि अकोले तालुक्यात प्रत्येकी एक या प्रमाणे 12 जनावरे मृत पावली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या